उन्हाळ्यात पाणी किती प्यावे?

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
02nd May, 11:07 pm
उन्हाळ्यात पाणी किती प्यावे?

उन्हाळा आला की निसर्ग आपल्याला रसदार फळं उपलब्ध करून देतो. उकाडा त्रासदायक वाटला तरी आंबा, जांभूळ, करवंदं, कलिंगड ही फळं बघितली तरी छान वाटतं. आणि या फळांची वेगवेगळी सरबतं करून प्यायल्यावर उकाडा सुसह्य होतो. उन्हाळ्यात नुसतं घरी बसून राहिलं तरी शरीर थकतं, तोंड कोरडं पडतं, उत्साह कमी असतो. हे सगळं का होतं? कारण आपल्या शरीरातून घामावाटे खूप पाणी निघून जातं. 

तुम्ही ती जाहिरात बघितली आहे का? उन्हाळ्यात मैदानावर मुलं आनंदाने क्रिकेट खेळत असतात, आणि वर आकाशात सूर्य हसत असतो. पण हळूहळू तो सूर्य एक मोठा स्ट्रॉ घेतो आणि खेळणाऱ्या मुलांच्या शरीरातून पाणी ओढायला लागतो. घाम येतो, ओठ कोरडे पडतात आणि मुलं थकून खाली बसतात. ही जाहिरात  एक छान संदेश देते. उन्हाळ्यात सूर्य खरोखरच आपल्या शरीरातलं पाणी घेऊन जातो... घामाच्या रूपात. शरीर थकतं आणि तोंड कोरडं पडतं. म्हणूनच उन्हाळ्यात पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे.

आपल्या आरोग्यासाठी पाणी का महत्त्वाचं आहे?

आपल्या शरीरात जवळजवळ ६०% पाणी असतं. हे पाणी रक्त पातळ ठेवतं, अन्न पचवायला मदत करतं, आणि शरीर थंड ठेवतं. जेव्हा पाणी कमी होतं, तेव्हा डोकं दुखतं, चक्कर येते, थकवा येतो आणि कशातंच लक्ष लागत नाही.

उन्हाळ्यात किती पाणी प्यावे?

तहान लागेल तेव्हा दुर्लक्ष न करता पाणी प्यावे. घरातून बाहेर जाताना, मैदानात खेळताना पाण्याची किंवा सरबताची बाटली जवळ ठेवावी. बऱ्याचदा खेळात, कामात असताना आपलं आपल्या शरीराकडे लक्ष नसतं त्यामुळे तहान, भूक लागलेली आपल्याला कळत नाही. कितीही दंग असलात खेळ खेळताना तरी मधे थांबून पाणी हवंय का शरीराला ते बघा आणि शरीराची गरज लगेच पुरवा. योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी किंवा सरबत प्यायले असता शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहिल आणि पाणी कमी झाल्यामुळे निर्माण होणारे त्रास होणार नाहीत. 

एकदम खूप पाणी गटागट पिऊ नये. तहान लागेल तेव्हा घोट घोट प्यावं.

फक्त पाणीच नाही तर लिंबू सरबत, कोकम सरबत, नारळ पाणी, शहाळ्याचे पाणी, धण्याचे पाणी असे थकवा नाहीसा करणारे, तहान भागवणारे पातळ पदार्थ सुद्धा तुम्ही पिऊ शकता. 

बाजारातील थंड कोल्डड्रिंक्स जास्त पिऊ नयेत. त्यात साखर आणि कृत्रिम रंग असतात जे शरीराचे नुकसान करतात. क्षणभर बरं वाटतं, पण तहान भागत नाही. सर्दी होणे, घसा खवखवणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे ही शीतपेये शक्यतो टाळा, माठातले वाळा घातलेले पाणी प्या. 

आपल्यासारखीच इतर प्राण्यांना आणि पक्ष्यांना सुद्धा उन्हाळ्यात जास्त तहान लागते. नद्या, ओहोळ, तळी आटून जातात, त्यामुळे पक्ष्यांना पाण्यासाठी खूप लांब प्रवास करावा लागतो. म्हणून प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीत, व्हरांड्यात थोडं पाणी ठेवा.

उन्हाळ्यात निरोगी राहायचं असेल तर योग्य प्रमाणात पाणी प्या आणि इतरांना सुद्धा पाणी द्या. 


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य