
उन्हाळा सुरू झाला की सगळीकडे फणसाचा गोड सुगंध दरवळायला लागतो. बाजारात मोठमोठे काटेरी फणस दिसले की तोंडाला पाणी सुटते. मग घरात फणस कापला की गोड, रसाळ गरे खाण्याची स्पर्धाच लागते.
पण तुम्हाला माहिती आहे का?
फणस खाऊन झाल्यावर त्याच्या बिया फेकून द्यायच्या नसतात. फणसाच्या बिया पौष्टिक असतात म्हणून त्यांचा आहारात समावेश करावा. फणसाच्या बियांना 'आठळ्या' असे म्हणतात.
फणसाच्या बिया कशा खाव्या?
फणसाच्या प्रत्येक गऱ्यामध्ये एक बी असते.
या बिया उकडून, भाजून किंवा आमटीत, भाजीत घालून खाल्ली जाते. फणसाच्या बिया घालून केलेली तायकिळ्याची भाजी किंवा शेवग्याच्या पानांची भाजी रुचकर लागते.
काही जण तर या बियांची चविष्ट भाजीही केली जाते.
फणसाच्या बिया खाल्ल्याने काय फायदा होतो?
१. शरीराला ताकद मिळते
२. पोट भरल्यासारखे वाटते
३. खेळून आल्यावर ऊर्जा मिळते
जास्त प्रमाणात आठळ्या खाल्ल्या की पोटात गॅस तयार होतो, पोटात, छातीत दुखू लागते. त्यावर एक उपाय म्हणून आठळ्या खाल्ल्यानंतर चिमूटभर ओवा खाऊन गरम पाणी पिणे. आमटीत किंवा भाजीत आठळ्या घातल्या असतील तर त्या दिवशी हिंग आणि ओवा घातलेली सोलकढी आईला करायला सांगा व ती जेवणानंतर प्या.
आठळ्या पचायला जड असतात त्यामुळे ज्यांची भूक आणि पचन शक्ती कमी आहे अशांनी आठळ्या खाऊ नयेत.
फणसाच्या आठळ्या उन्हाळ्यातच मिळतात. पण नंतर कधी खाव्याश्या वाटल्या तर??? त्यासाठी सुद्धा आजीची युक्ती वापरून बियांना राख लावून, त्या उन्हात सुकवून वर्षभरासाठी साठवल्या जाऊ शकतात. आहे की नाही गंमत. या उन्हाळ्यात फणसाच्या बिया साठवून ठेवण्याचा प्रयोग करून बघा.
आपण अनेकदा फक्त फळ खातो आणि बिया टाकून देतो. पण आपल्या आजी-आजोबांना या बियांचे महत्त्व माहिती होते. ही माहिती लक्षात ठेवा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना सुद्धा सांगा.

वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य