शहारामधला 'आदित्य' आणि गावाकडची जादू

Story: छान छान गोष्ट |
09th May, 10:47 pm
शहारामधला 'आदित्य'  आणि  गावाकडची जादू

अा​दित्य नावाचा एक मुलगा होता. त्याचं जग एका टोलेजंग इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटपुरतं मर्यादित होतं. सकाळी अलार्म वाजला की त्याचं यांत्रिक आयुष्य सुरू व्हायचं. शाळेची पिवळी बस दारात यायची, शाळेत गेल्यावर शिक्षक कम्प्युटरच्या मोठ्या स्क्रीनवर धडे शिकवायचे आणि मधल्या सुट्टीत मुलं जमिनीला स्पर्श न करता रबरी मॅटिंगच्या मैदानावर खेळायची.

शाळेतून घरी आल्यावर घराला कुलूप असायचं. स्वतःच्या गळ्यातल्या किल्लीने दार उघडणं, फ्रीजमधलं थंड जेवण ओव्हनमध्ये गरम करून खाणं आणि त्यानंतर टीव्ही किंवा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवून जाणं, हा त्याचा नित्यक्रम होता. शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं, याची त्याला कधी उत्सुकता वाटली नाही आणि त्याला कुणी विचारलंही नाही. रात्री आई-बाबा कामावरून यायचे, पण जेवतानाही एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात घास असायचा. आदित्यला वाटायचं, आयुष्य असंच असतं. वेगवान, चकचकीत आणि एकटं.

एके दिवशी उन्हाळ्याच्या सुट्टीत धाकट्या मामाच्या मुंजीचं आमंत्रण आलं. आई म्हणाली, "आदित्य, आपल्याला गावी जायचंय." गावाचं नाव ऐकताच आदित्यचा चेहरा पडला. "तिथे रेंज नसते आई! मी काय करणार तिथे?" त्याने खूप त्रागा केला, पण आई-बाबांसमोर त्याचं काही चाललं नाही. नाईलाजाने तो गावी पोहोचला.

गावचा तो जुना वाडा, शेणाने सारवलेली जमीन आणि मातीच्या भिंती पाहून आदित्यला तिथे राहणं अशक्य वाटू लागलं. "छी! इथे एसी पण नाहीये," तो पुटपुटला. पण तितक्यात मोठ्या मामाची मुलं धावत आली. त्यांनी हसत आदित्यची बॅग ओढून घेतली आणि त्याला माळ्यावर घेऊन गेली. उष्णतेने हैराण झालेल्या आदित्यला ती मुलं 'कुळागरात' घेऊन गेली. तिथे उंच माड, पोफळी, फणसाची झाडं आणि आंब्याचा घमघमाट होता. मोबाईलची रेंज नसली तरी, निसर्गाच्या कुशीत एक वेगळीच 'कनेक्टिव्हिटी' होती. त्याने शहाळ्याचं गोड पाणी प्यायलं आणि रसाळ हापूसवर ताव 

मारला.

दिवस कसे सरले त्याला कळलंच नाही. ज्याला फक्त व्हिडिओ गेम्स माहित होते, तो आता विटी-दांडू आणि लपंडाव खेळू लागला होता. संध्याकाळी शुभंकरोति म्हणून झाल्यावर आजीने त्याला जवळ घेतलं आणि अर्थ समजावून सांगितला. मामीने दिलेली गरम गुळपोळी खाताना त्याला ओव्हनमध्ये गरम केलेल्या जेवणाची चव अगदीच फिकी वाटू लागली.

रात्रीच्या वेळी अंगणात पंगत बसली. आमरस-पुरीचा बेत होता. शहरात 'डाएट' आणि 'कॅलरीज' मोजणारे त्याचे आई-बाबा आज मनसोक्त जेवत होते. जेवण झाल्यावर सगळेजण गप्पा मारत बसले. आई-बाबा आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना इतके हसत होते की आदित्य बघतच राहिला. त्याला पहिल्यांदा जाणवलं की त्याचे आई-बाबा किती छान गप्पा मारू शकतात!

रात्री चांदण्यात झोपायची वेळ आली. आदित्यला आधी भीती वाटली, पण आजीने त्याला कुशीत घेतलं आणि राजा-राणीच्या गोष्टी सांगता सांगता तो कधी गाढ झोपला, हे त्यालाही समजलं नाही. मुंजीचा सोहळा तर धामधुमीत पार पडला.

सकाळी परत जाण्याची वेळ आली. टॅक्सी दारात उभी होती. आदित्यने आपली बॅग उचलली, पण त्याचे पाय जड झाले होते. त्याने वळून त्या जुन्या वाड्याकडे पाहिलं. आजी दारात डोळे पुसत उभी होती, मामाची मुलं त्याला पुन्हा येण्याचं वचन मागत होती.

आदित्यने आईचा हात धरला आणि हळूच विचारलं, "आई, आपण पुढच्या सुट्टीत पुन्हा येऊया का गं? मला इथे पुन्हा यायचंय."

आईने त्याला जवळ घेतलं. आदित्यला समजलं होतं की, शहरातल्या वाय-फाय पेक्षा गावाकडच्या या मायेच्या माणसांची 'रेंज' कितीतरी जास्त पटीने शक्तिशाली असते. ज्या गावाला तो 'ओल्ड फॅशन्ड' समजत होता, त्याच गावाने त्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवलं होतं. शहरातल्या फ्लॅटच्या भिंती आता त्याला लहान वाटू लागल्या होत्या, कारण त्याचं मन आता कोकणच्या त्या विशाल अंगणात अडकून पडलं होतं.


- स्नेहा सुतार