जंगल झाले रंगीत!

Story: छान छान गोष्ट |
25th April, 11:11 pm
जंगल  झाले  रंगीत!

​एका सुंदर आणि हिरव्यागार जंगलात 'बनी' नावाचा एक छोटासा ससा राहायचा. बनी खूप गोंडस होता आणि त्याचे आई-बाबा त्याच्यावर खूप प्रेम करायचे. बनीची आई खूप हुशार होती. ती जंगलातील सगळ्यात छान शिंपीण होती. ती बनीसाठी रोज नवीन आणि रंगीबेरंगी कपडे शिवायची. कधी लाल मखमली कोट, तर कधी निळी छोटी पॅन्ट!

बनी जेव्हा ते कपडे घालून जंगलात फिरायला जायचा, तेव्हा त्याचे सगळे मित्र थक्क होऊन बघायचे. "वा! बनी, तुझे कपडे किती छान आहेत रे!" असं सगळे म्हणायचे.

एक दिवस बनी म्हणाला, "मित्रांनो, तुम्हालाही असे कपडे हवेत का? मग चला माझ्या घरी! माझी आई तुम्हा सर्वांना मस्त कपडे शिवून देईल." मग काय? जिराफ, हत्ती, माकड, अस्वल आणि छोटी खारूताई सगळे जण रांगेत बनीच्या घरी पोहोचले. बनीच्या आईने हसून सगळ्यांचे स्वागत केले आणि ती कामाला लागली.

सगळ्यात आधी आला जिराफ. जिराफची मान कित्ती उंच! बनीच्या आईने वर पाहिले, तर जिराफचे तोंड आभाळाला टेकले होते. मग आईने एक मोठी शिडी काढली. आई शिडीवर चढली आणि जिराफच्या गळ्याचे माप घेऊ लागली. जिराफला गुदगुल्या होऊ लागल्या आणि तो हसायलाच लागला. मग आईने त्याला एक लांबच लांब आणि सुंदर 'मफलर' शिवून दिला.

त्यानंतर आला आपला गब्बू हत्ती. हत्ती एवढा मोठा की त्याचे माप घ्यायचे कसे? बनीची आई हातात मोठ्ठी टेप घेऊन हत्तीभोवती गोल गोल पळू लागली. हत्ती आपली सोंड हलवत उभा होता. हत्तीसाठी आईने एक मोठ्ठा झगा शिवला. हत्ती आनंदाने थुईथुई नाचू लागला.

आता आली माकडाची बारी. पण माकड एका जागी बसेल तर ना! ते कधी या फांदीवर, तर कधी त्या फांदीवर उड्या मारत होतं. बनीची आई म्हणाली, "अरे बाबा, नीट उभा राहा!" आईने विचार केला की हे माकड खूप उड्या मारतं, याचे कपडे तर लगेच फाटतील. म्हणून आईने त्याच्यासाठी खास 'न फाटणारे' आणि मजबूत कापडाचे पँट-शर्ट शिवले. आता माकड कितीही उड्या मारलं तरी त्याचे कपडे फाटणार नव्हते!

शेवटी आली इवलीशी खारूताई. ती खूपच छोटी होती. आईने तिच्यासाठी अगदी छोटासा, फुलांसारखा फ्रॉक शिवला. तो फ्रॉक घालून खारूताई आरशात बघून स्वतःचेच कौतुक करू लागली.

अस्वलाला सुद्धा आईने एक छान टोपी शिवून दिली. सगळ्या मित्रांचे कपडे तयार झाले. जंगल आता अगदी रंगीबेरंगी दिसू लागलं होतं.

सगळ्या प्राण्यांनी बनीच्या आईचे आभार मानले. "थँक्यू काकू! तुम्ही किती छान कपडे शिवलेत!" असं म्हणून सगळ्यांनी तिला कुरवाळले. बनीला आपल्या आईचा खूप अभिमान वाटला. मग काय? सगळे मित्र नवीन कपडे घालून आनंदाने जंगलात खेळायला निघून गेले.

सगळीकडे आनंदच आनंद पसरला! बनी आणि त्याची आई दुरून या सर्व मित्रांना खेळताना बघून आनंदाने हसत होते.


- स्नेहा सुतार