खोडकर कोल्ह्याला घडवली अद्दल!

Story: छान छान गोष्ट |
23rd May, 10:17 pm
खोडकर कोल्ह्याला घडवली अद्दल!

ए​का घनदाट, हिरव्यागार जंगलात एक कोल्हा राहत होता. त्याचं नाव होतं कोल्हाभाई. कोल्हाभाई खूप हुशार होता, पण त्याची हुशारी नेहमी दुसऱ्यांना त्रास देण्यासाठीच असायची. त्याला उगीच याच्या-त्याच्या खोड्या करायला खूप आवडायचं. कोणाला खोटं सांगायचं, कोणाला भडकावायचं, आणि मग त्यांची फजिती पाहून हसायचं, हा त्याचा रोजचा छंद होता. जंगलातले सगळे प्राणी कोल्हाभाईच्या खोड्यांनी पुरते त्रस्त झाले होते.

एक दिवस दुपारी, कोल्हाभाई नदीकाठावरून जात होता. तिथे नदीच्या पाण्यात एक छोटंसं, गोंडस गजा हत्तीचं पिल्लू मज्जेत डुंबत होतं. पिल्लू पाण्यात खेळताना खूप आनंदी होतं. कोल्हाभाईच्या मनात पुन्हा खोडकर विचार आला. तो पिल्लूच्या जवळ गेला आणि चेहरा गंभीर करून म्हणाला, "अरे पिल्लू! तू इथे मज्जेत खेळतोयस आणि तुला माहितीय, तुझी आई तुला या जंगलात सोडून कायमची चाललीये?"

ते लहान पिल्लू होतं, कोल्हाभाईच्या खोट्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला. त्याच्या मनात भीती भरली आणि ते बिचारं तिथेच फतकल मारून मोठ्याने रडायला लागलं. गजा हत्तीच्या पिल्लाचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज जंगलात घुमू लागला. त्याचे वडील गजा हत्ती लांब झाडाखाली विश्रांती घेत होते, त्यांनी पिल्लाचा रडण्याचा आवाज ऐकला आणि ते घाबरून धावत नदीकडे आले.

गजाने पिल्लाला रडताना बघून विचारलं, "काय झालं बेटा? का रडतोयस?" पिल्लू रडत रडत म्हणालं, "आई मला सोडून चाललीये!" गजाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, "नाही रे बेटा, आई कुठेही गेली नाहीये. तुझी आई तिच्या मावशीकडे पलीकडच्या टेकडीवर गेली आहे. संध्याकाळ व्हायच्या आत ती येणार आहे."

गजाने पिल्लाला खूप समजावून सांगितलं, पण पिल्लाचं मन मानत नव्हतं. ते कोल्हाभाईच्या खोट्या गोष्टीमुळे खूप घाबरलं होतं. ते बिचारं पिल्लू संध्याकाळी आपली आई येईपर्यंत रडत उपाशी राहिलं. आई आली आणि तिने पिल्लाला जवळ घेतलं, तेव्हाच पिल्लू शांत झालं.

गजा हत्तीला समजलं की हे सगळे खोडकर कोल्हाभाईचे कारस्थान आहे. त्याला कोल्हाभाईचा खूप राग आला. गजाने मनाशी ठरवलं की, "या कोल्ह्याला अशी काही अद्दल घडवायची की तो पुन्हा कधी कोणाची खोडी करणार नाही." त्याला एक युक्ती सुचली.

काही दिवसांनी, कोल्हाभाई जंगलात फिरत होता. गजा हत्तीने कोल्हाभाई जवळ आहे असं बघून आपल्या गंपू हत्ती मित्राला गोष्ट सांगायला सुरुवात केली. गजा मोठ्याने म्हणाला, "अरे गंपू! तुला माहितीय, पलीकडच्या जंगलात एक खूप मोठं वारूळ आहे. पण त्या वारुळात मुंग्यांनी आता पाऊस येणार म्हणून इतकी मिठाई आणून ठेवली आहे की ते वारूळ तुडुंब भरून गेले आहे! त्यांनी तर आता ते वारूळ फक्त मिठाईसाठीच ठेवलंय आणि त्यांना राहायला म्हणून बाजूलाच अजून एक छोटंसं वारूळ बांधायचं काम सुरू केलंय."

कोल्हाभाई हे ऐकून लगेच सावध झाला. मिठाईचं नाव ऐकताच त्याच्या कानात तेल पडलं. गजा पुढे म्हणाला, "अरे! तुला काय सांगू त्या वारुळात काय काय आहे! मी तर त्यांना गुलाबजाम घरंगळत नेताना बघितलं! काजू कतली तर इतकी भरली आहे की एक मोठी खोली काजूकतलीचीच आहे. त्याशिवाय बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, पुरणपोळी, मिल्क केक... काय सांगू तुला... यावेळी पावसात मुंग्यांची तर मज्जाच आहे."

कोल्हाभाईच्या तोंडाला मिठाईची नावे ऐकून पाणी सुटले. त्याचे डोळे चमकू लागले. "काजू कतली! गुलाबजाम! लाडू! बापरे! मला तर ही सगळी मिठाई पाहिजे. मी कसाही करून त्या वारुळाकडे जायला पाहिजे आणि ती मिठाई फक्त करायची!" त्याने मनाशी असा विचार केला.

संध्याकाळी कोल्हाभाई त्या वारुळाकडे निघाला. तो विचार करत होता, "काळोख होईल तसा कोणाला दिसणार नाही. हळूच जाऊन वारुळातलं सगळं गोड खाऊन टाकू!" लांबूनच वारूळ पाहून त्याच्या तोंडाला पुन्हा पाणी सुटलं. ते वारूळ खरंच खूप मोठं होतं.

तो वारुळाच्या दिशेने गेला आणि आजूबाजूला इकडे-तिकडे बघितलं. त्याला खात्री पटली की कोणीही तिथे नाहीये. त्याने वारुळाचं दार शोधायला सुरुवात केली. शेवटी त्याला वारुळाचं प्रवेशद्वार सापडलं. त्याने पुन्हा एकदा खात्री केली की आजूबाजूला कोणीही नाही, आणि कोणाचं लक्ष नाही. मग त्याने सरळ वारुळाच्या दारात आपले तोंड खूपसले!

कोल्हाभाईने तोंड खूपसल्याबरोबर वारुळाला मोठा धक्का बसला! वारुळाच्या आतल्या हजारो मुंग्या इकडे-तिकडे जोरजोरात पळू लागल्या. त्यांची राणी मुंगी घाबरली, तिने लगेच फर्मान सोडलं, "हल्ला करा! कोणीतरी आपल्या घरावर हल्ला केला आहे!" सगळ्या मुंग्या धक्का लागलेल्या दाराच्या दिशेने धावल्या. त्यांनी कोल्हाभाईवर जोरात हमला सुरू केला!

हा हल्ला सरळ कोल्ह्याच्या तोंडावरच झाला होता. त्याचे तोंड तेवढे फक्त वारुळाच्या दारात गेल्यामुळे त्याला बाहेर काय चाललंय ते काहीच दिसत नव्हतं. मुंग्यांनी त्याला कडाकडा चावायला सुरुवात केली! कोल्हाभाई "हाय! होय! बाय!" करत ओरडायला लागला. त्याने तोंड वारुळातून बाहेर काढलं. त्याचे तोंड मुंग्यांनी भरलेलं होतं आणि त्याला काहीच समजत नव्हतं की काय करावं.

तो वेदनेने इकडे-तिकडे नाचू लागला, ओरडू लागला. पण तो जसा नाचत होता, तशा मुंग्या अजून त्याला कडाडून चावत होत्या. कोल्हाभाई खूप रडला आणि पळू लागला. शेवटी मुंग्यांनी त्याला सोडलं.

दुसऱ्या दिवशी कोल्हाभाई जंगलात दिसला, पण त्याचं तोंड खूप सुजलेलं होतं! इतरांची मस्ती आणि मस्करी करणाऱ्या कोल्हाभाईला आज बरीच मोठी शिक्षा मिळाली होती. त्याला समजलं होतं की दुसऱ्यांना त्रास दिल्यावर त्याचं फळ वाईट असतं. त्याने मनाशी ठरवलं की तो पुन्हा कधी कोणाची खोडी करणार नाही. जंगलातले सगळे प्राणी आता शांततेत राहू लागले. आणि अशा प्रकारे गजा हत्तीने आपल्या युक्तीने कोल्हाभाईला अद्दल घडवली.


- स्नेहा सुतार