
एका घनदाट हिरव्यागार जंगलात एक आई वाघीण आपल्या दोन पिल्लांसोबत राहत होती. ती जशी अत्यंत प्रेमळ होती, तशीच आपल्या मुलांसाठी शिस्तप्रियही होती. ती रोज रात्री पिल्लांना कुशीत घेऊन नवनवीन गोष्टी सांगायची. जंगलात हुशार आणि सुरक्षित कसे राहायचे, याचे धडे ती त्यांना द्यायची.
असेच एके दिवशी तिने पिल्लांना जवळ बोलावून सांगितले, "ऐका बाळांनो, हे जंगल जितके सुंदर आहे, तितकेच ते आव्हानात्मकही आहे. इथे राहणारे सगळेच प्राणी नेहमी चांगले नसतात. काही जण उगीच भांडण उकरून काढतात, तर काही इतरांना त्रास देतात. तुम्ही मात्र अशा नको त्या गोष्टींपासून नेहमी दूर राहायचे." पिल्लांनी उत्सुकतेने मान डोलवली आणि "हो आई!" असे म्हटले.
आणि एक दिवस वाघीण आईने सांगितले होते ते तंतोतंत खरे ठरले. त्या जंगलातील एका मोठ्या वडाच्या झाडावर दोन माकडे एकमेकांशी जोरात भांडत होती. त्यांच्या आरडाओरड्यामुळे आणि रागामुळे जंगलातील इतर लहान प्राणी खूप घाबरेगुबरे झाले. पक्षांची किलबिलाट वाढली. हे पाहून त्यातले एक वाघाचे पिल्लू उत्सुकतेने म्हणाले, "आई, चल ना, आपण बघूया तिथे काय चालले आहे ते!"
आई वाघीण पटकन म्हणाली, "नाही बाळा, वाईट गोष्टींकडे फक्त लांबून बघत राहणे पुरेसे नसते. जर समाजात किंवा आपल्या अवतीभवती अशा चुकीच्या गोष्टी घडत असतील, तर त्या वाढू न देता वेळेत थांबविल्या पाहिजेत. भांडण मिटवणे हे खूप पुण्याचे आणि चांगले काम आहे."
मुलांना हा महत्त्वाचा संस्कार सांगत सांगत ती हळूच त्या माकडांच्या जवळ गेली. तिने कसलाही राग न दाखवता अगदी शांतपणे विचारले, "अरे भावांनो, तुम्ही दोघे असे का भांडत आहात? काय बरे झाले आहे? शेवटी तुम्ही एकाच जंगलात राहणारे भावंडच आहात ना?"
समोर अचानक वाघिणीला पाहून माकडे थोडी दचकली आणि शांत झाली. त्यातले एक माकड रागाने म्हणाले, "बघा ना वाघीण ताई, हा माझं अन्न ओढून घेतो. मी मोठ्या कष्टाने जे फळ आणले होते, ते याने चोरून खाल्ले." त्यावर दुसरे माकड लगेच म्हणाले, "नाही वाघीण ताई, हा उगीच काहीही सांगतो आहे. हे फळ माझेच आहे."
आई वाघीण मंद हसली आणि शांतपणे म्हणाली, "ऐका, हे जंगल आपले सर्वांचे घर आहे. इथे एकत्र राहायचे तर भांडण करून चालणार नाही. निसर्गाने आपल्याला इथे जे काही दिले आहे, ते एकमेकांना वाटून आनंदाने खाल्ले पाहिजे. मिळून-मिसळून राहण्यातच खरी ताकद आहे."
ती अत्यंत प्रेमळ आणि मधुर शब्दांत समजावत होती. तिच्या शब्दांत एक वेगळेच बळ आणि जिव्हाळा होता. तिच्या चेहऱ्यावर जराही राग नव्हता की वागण्यात तापटपणा. वाघिणीचे हे शांत आणि समजूतदार रूप पाहून माकडांनी शरमेने मान खाली घातली. त्यांना आपल्या वागण्याची खूप लाज वाटली. त्यांनी वाघीण ताईचा आदर केला, तिचे ऐकले आणि आपसातील राग विसरून ते अन्न आनंदाने वाटून खाल्ले.
दोन्ही पिल्ले झाडीमागून हे सारे कौतुकाने पाहत होती. त्यांना आपल्या आईचे ते धीरगंभीर आणि प्रेमळ रूप पाहून खूप आनंद झाला. आईने त्यांना जवळ घेतले, मायेने चाटले आणि म्हणाली, “पहा बाळांनो… वाईट गोष्टींकडे फक्त पाहत बसायचे नसते. काही वेळा जगातील सर्वात कठीण प्रश्नही आपण प्रेमाचे दोन शब्द बोलून सोडवू शकतो. मनातील राग शांत करत, योग्य वेळ साधून, समजूतदारपणे वाईट गोष्टी थांबवायच्या असतात.”
वाघिणीची पिल्ले आनंदाने नाचत म्हणाली, "हो आई, आम्हीही मोठे झाल्यावर तुझ्यासारखेच शांतपणे, हळूच आणि मायेने इतरांना समज देऊ आणि भांडणे मिटवू!"
तेवढ्यात बाजूच्या झुडपावर त्यांचे लक्ष गेले, तिथे दोन चिमण्या एका दाण्यासाठी एकमेकांना चोच मारत भांडत होत्या. पिल्ले क्षणाचाही विचार न करता तिथे धावली. त्यांनी आईच्या उपस्थितीत त्या चिमण्यांनाही प्रेमाने समजावून त्यांचे भांडण मिटवले. झाडांवर बसलेले पक्षी, बाजूला उभे असलेले हरिण आणि कोल्हे हे सारे कौतुकाने पाहत होते. पिल्लांची ही हुशारी पाहून जंगलातील प्राण्यांनी आनंदाने आणि समाधानाने आवाज केला. आख्खे जंगल जणू पिल्लांचे कौतुक करत होते.
आई वाघीण आपल्या पिल्लांची ही कृती पाहून मंद हसली आणि गर्वाने म्हणाली, "शाब्बास बाळांनो! हे धडे आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा बरे!" सर्व प्राण्यांनी आणि पिल्लांनी 'हो' म्हणून मान डोलावली. आपापले भांडण मिटवून सगळे आनंदाने आपल्या वाटेने गेले. जंगलातील कोलाहल थांबला आणि तिथे पुन्हा एक सुंदर शांतता पसरली. म्हणूनच अशी ही जंगलाची खरी शांतता होती, जी भीतीपोटी नाही, तर प्रेमामुळे निर्माण झाली होती.
बोध:- भांडणे पाहत बसू नये, ती शांत करण्यासाठी आणि समाजात शांतता टिकवण्यासाठी नेहमी स्वतःहून पुढाकार घ्यावा.

सोनाली सु. पेडणेकर