Home >> हुप्पा हुय्या >> शाळा आणि आरोग्य एक महत्त्वाची सवय

शाळा आणि आरोग्य एक महत्त्वाची सवय

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
27th June, 11:35 pm
शाळा आणि आरोग्य एक महत्त्वाची सवय

शाळा सुरू झाली आहे आणि तुमचं रोजचं रूटीन सुद्धा सुरू झालं असेल ना... सकाळी लवकर उठणे, अंघोळ, नाश्ता करून गाडीची वाट बघणे, शाळेत जाऊन मन लावून अभ्यास करणे इ. शाळेत आपण खूप मज्जा करतो, शिकतो पण काही वेळा आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. आरोग्याच्या बाबतीतल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या दुर्लक्षित केल्या तर तब्येत बिघडू शकते. आपल्या शरीरात अन्न आणि पाण्याचे पचन झाल्यानंतर जे अनावश्यक घटक तयार होतात जसे की शी आणि शू, ते योग्य वेळी आपल्या शरीरातून बाहेर टाकले पाहिजेत. ते तयार झाले की बाहेर टाकण्यासाठी शरीराकडून आपल्याला सिग्नल पाठवले जातात.

​शाळेत असताना अनेक मुले शूला जाण्याची इच्छा झाली तरी ती दाबून ठेवतात. वर्गात लाज वाटेल, मित्र हसतील किंवा शिक्षक रागावतील अशी भीती काही वेळा यामागे असते, तर काही वेळा कंटाळा केला जातो. पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे.

​शू रोखल्याने काय होऊ शकते?

​जेव्हा आपण 'शू'ची इच्छा दाबतो, तेव्हा मूत्राशय (ब्लॅडर) - जिथे लघवी साठवली जाते तो अवयव, जास्त वेळ ताणलेला राहतो. यामुळे पुढील त्रास होऊ शकतात:

१. पोटात किंवा ओटीपोटात दुखणे.

२. मूत्रमार्गाचा संसर्ग (इन्फेक्शन) होण्याची शक्यता वाढते.

३. वारंवार ही सवय राहिल्यास मूत्राशयाची कार्यक्षमता कमी होऊ शकते, मूतखडा सुद्धा होऊ शकतो.

४. अभ्यासात लक्ष लागत नाही आणि मन अस्वस्थ होते.

​हे त्रास होऊ नये म्हणून काय करावे?

​१. मधल्या सुट्टीच्या वेळी (रिसेसमध्ये) आधी स्वच्छतागृहात जाण्याची सवय ठेवा.

२. तीव्र इच्छा झाल्यास न लाजता शिक्षकांना स्पष्टपणे सांगा की, "मला वॉशरूमला जायचे आहे."

३. पाणी प्यायल्याने शू होते म्हणून बरीच मुलं पाणी पिणे टाळतात. तहान लागेल तेव्हा पाणी पिणे आवश्यकच आहे.

४. घरातून निघण्यापूर्वी एकदा शू करून जा.

​लक्षात ठेवा, शरीरात निर्माण झालेले शूचे सिग्नल समजून ते पूर्ण करणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही, उलट ती आरोग्याची काळजी घेण्याची चांगली सवय आहे. पालक आणि शिक्षकांनीही मुलांना यासाठी मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहन द्यावे.

वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य