आजीचं मांजर आणि कोंबडी

Story: छान छान गोष्ट |
06th June, 11:07 pm
आजीचं मांजर आणि कोंबडी

एका छोट्याशा घरात एक प्रेमळ आजीबाई राहत होती. ती एकटीच राहत होती, म्हणून तिने आपल्या घरात एक मांजर आणि एक कोंबडी सांभाळली होती. तिला त्या पाळीव प्राण्यांचा फार लळा होता.

​आजीबाई त्या दोघांची खूप काळजी घेत असे. त्यांना वेळेवर खायला देत असे, त्यांच्याशी गोड बोलत असे आणि त्यांची वेळोवेळी चौकशी करत राही. हे तिचं रोजचं काम झालं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मांजर आणि कोंबडीही तिचं बोलणं जणू सहज समजून घेत असत. आजीच्या वागण्याने ती दोघेही फार समजूतदार झाली होती. हळूहळू त्या दोघांची छान मैत्री झाली होती.

​सकाळी सोडताच कोंबडी दिवसभर अंगणात फिरायची. मग तिला अनेक पक्षी, कोंबड्या आणि इतर प्राणी भेटायचे. कधी कधी खेळताना किंवा मिळालेल्या अन्नावरून छोट्या छोट्या भांडणांत ती गुंतायची. दुसरीकडे, मांजर घराच्या पडवीत शांतपणे बसून हे सगळं पाहत असे. मांजरबाई खूप हुशार आणि शांत स्वभावाची होती.

​जेव्हा कोंबडीचे भांडण थोडे जास्त वाढायचे, तेव्हा मांजर लगेच पुढे येऊन आपल्या खास आवाजात 'म्याऊ म्याऊ' करत पुढे जायची आणि त्यांना शांत करायची. तिच्या त्या आवाजाने सगळे प्राणी थांबायचे आणि काही वेळात भांडण कमी व्हायचे, थांबायचे. कोंबडीला मात्र आपल्या मनातले होत नाही हे पाहून सुरुवातीला राग यायचा, पण नंतर काही दिवसांत तिला कळलं की मांजर काही वाईट करत नाही, तर तिला त्या भांडणातून मुक्त करत तिचं रक्षणच करत आहे. हळूहळू कोंबडीनेही आपला राग कमी केला आणि ती शांतपणे वागायला शिकली. चांगल्या दोस्तीचा असर चांगला झाला.

​आजीचे लक्ष त्यांच्यावर होतेच आणि आजीबाई हे सगळं पाहून खूप आनंदी होत असे. ती म्हणायची, "पहा बाळांनो, आपण जरी वेगवेगळे असलो तरी प्रेमाने राहिलं की मैत्री छान टिकते."

​मांजर आणि कोंबडी दोघींनीही एकमेकांना समजून घेतलं. त्यांची मैत्री अजून खूप घट्ट झाली. कोंबडी हळूहळू त्या बारीक-मोठ्या भांडणांपासून दूर राहिली. आजीचे दिवस त्यांच्यासोबत खूप छान जात होते. अशा प्रकारे त्या छोट्या घरात नेहमी शांतता आणि आनंद नांदू लागला... कोंबडी आणि मांजर आजीच्या प्रत्येक गोष्टी पटकन ओळखू लागल्या; ती जाईल तिथे जाऊ लागल्या.

​बोध: आपण वेगवेगळे असलो तरी, एकमेकांना सांभाळून घ्यायचे असते.


सोनाली सु. पेडणेकर