
सकाळी शाळेची घाई असते, दप्तर भरायचे असते, गणवेश घालायचा असतो आणि त्या गडबडीत नाश्ता मात्र राहून जातो. अनेक मुले रिकाम्या पोटीच शाळेत जातात. त्यामुळे सकाळी शाळेत प्रार्थना सुरू असताना काही मुलं चक्कर येऊन पडतात. सकाळी शरीराला ऊर्जेची गरज असते. रिकाम्या पोटी शाळेत गेल्यावर अभ्यासात लक्ष लागत नाही, डोके दुखते, चिडचिड होते आणि शिकण्याची क्षमता कमी होते.
'वेळ नाही' हे कारण अनेकदा ऐकायला मिळते. पण काही पदार्थ असे आहेत जे झटपट खाता येतात आणि पोषणही भरपूर देतात. राजगिरा वडी किंवा राजगिरा चिक्की, चुरमुऱ्यांचा लाडू, मखाना चिवडा असे घरी आधीच करून ठेवता येणारे पदार्थ. हे पदार्थ कोरडे असल्यामुळे मळमळ, उलटी होत नाही. सकाळी फक्त एक-दोन वड्या किंवा लाडू खाल्ले तरी पोट भरते आणि ताकदही मिळते. केळे हे निसर्गाने दिलेले, सहज उपलब्ध पौष्टिक फळ आहे आणि ते सोलायला एक मिनिटही लागत नाही. खजूर आणि सुका मेवा एका छोट्या डब्यात आधीच भरून ठेवला तर सकाळी कुठलीही तयारी न करता खाता येतो.
नाचणी सत्व प्यायल्यास किंवा नाचणी सत्त्वाची कापं खाल्ल्यास शरीराला कॅल्शियम, लोह आणि आवश्यक पोषण एकत्र मिळते. साजूक तूप, साखर लावलेला पोळीचा रोल सुद्धा पटकन खाता येतो. असे अजून पुष्कळ पदार्थ आहेत जे पटकन खाता येतात आणि शरीराला ताकद देतात.
असे पटकन करता येतील आणि सकाळी खाता येतील अशा तुम्हाला आवडणाऱ्या हेल्दी पदार्थांची यादी तयार करा. आणि रोज नाश्ता करून शाळेला जायला सुरुवात करा.
बरीच मुलं रात्री उशिरा जेवतात त्यामुळे सकाळी उठल्यावर लवकर भूक लागत नाही आणि मग वेळ असून सुद्धा नाश्ता करत नाहीत. ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे रात्री लवकर म्हणजे ७:३० वाजेपर्यंत जेवा. असे केल्याने पचन नीट पूर्ण होऊन, सकाळी उठल्यानंतर भूक लागेल व तुम्ही नाश्ता कराल.
लक्षात ठेवा सकाळी घरी नाश्ता केला की शरीराला ऊर्जा मिळते, अभ्यास चांगला होतो आणि दिवसभर उत्साह राहतो. त्याशिवाय बाहेरचे अरबट-चरबट पदार्थ खायची इच्छा सुद्धा होत नाही. रोज सकाळी नाश्ता करा आणि ताकदवान बना.