Home >> हुप्पा हुय्या >> पाठीवरचं दप्तर आणि दुखणारी पाठ!

पाठीवरचं दप्तर आणि दुखणारी पाठ!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
20th June, 11:06 pm
पाठीवरचं दप्तर आणि दुखणारी पाठ!

शाळेत जाताना पाठीवर भलं मोठं दप्तर असतं. पण ते दप्तर किती जड आहे याचा कधी विचार केलाय का? बऱ्याच मुलांची शाळेतून घरी आल्यावर पाठ दुखते, खांदे दुखतात. बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने अभ्यासाला बसल्यास सुद्धा पाठ दुखते. त्यामुळे काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या 

पाहिजे. 

पूर्वी दप्तरं ही आडवी असायची. त्यामुळे वह्या, पुस्तकं दप्तरात उजव्या व डाव्या बाजूला घालता येत असत. अश्या दप्तरांमुळे दोन्ही खांद्यांवर संप्रमाणात ओझं विभागलं जायचं. आता मधेच सगळी पुस्तकं असल्यामुळे दप्तराच्या वजनाने खांदे, मणका ताणला जातो. त्यातही बरीच मुलं दप्तर एकाच खांद्यावर चढवतात. त्यामुळे सुद्धा पाठ , खांदा, मान दुखू लागते. 

पाठदुखी होऊ नये म्हणून काय करावं?

१. रोज फक्त वेळापत्रकानुसार लागणारी पुस्तकेच दप्तरात घ्या.

२. दोन्ही खांद्यांवर दप्तर घाला, एकाच खांद्यावर नको.

३.  घरी आल्यावर पाठीला आराम द्या, थोडा वेळ सरळ पाठीवर झोपा.

४. पाठीच्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी रोज पाठीला, खांद्यांना तीळ तेलाने मालिश करा. 

बसण्याची पद्धत नीट करा

१.वर्गात, घरी अभ्यास करताना अनेक मुलं वाकून, मान खाली घालून बसतात. हे चुकीचं आहे. 

२.पाठ सरळ ठेवा, दोन्ही पाय जमिनीवर टेकवा, पुस्तक डोळ्यांसमोर धरा, या सवयी लहानपणापासूनच लावून घ्या.

३. सोफ्यावर लोळत अभ्यास करू नका. 

४. खुर्चीत बसताना पाठीचा कणा सरळ व पाय खाली ठेवा. बरेच जण एक पाय खुर्चीच्या आर्म रेस्ट वर टाकून बसतात. असे बसल्याने पाठीच्या कण्यावर ताण येतो आणि पाठीच्या कण्याची नैसर्गिक ठेवण बदलू लागते. पुढे माकड हाड किंवा पाठ दुखू लागते.

पाठीचा कणा व स्नायू स्ट्राँग करण्यासाठी ताडासन, भुजंगासन, सेतू बंधासन , त्रिकोणासन, अर्ध कटी चक्रासन इ. आसनं करा. रोज तेलाने मालिश करा, पाठीचा कणा ताठ ठेवा आणि आनंदी रहा. 

- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य