Home >> हुप्पा हुय्या >> फळं खाण्याआधी…

फळं खाण्याआधी…

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
25th July, 10:32 pm
फळं खाण्याआधी…

तुम्हाला आंबा, सफरचंद, द्राक्षे, पेरू अशी रसाळ फळे आवडतात ना? पण फळे खाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट करायला विसरू नका, ती म्हणजे फळे स्वच्छ पाण्याने धुणे.

शेतातून किंवा बागेतून फळे आपल्यापर्यंत येईपर्यंत त्यांच्यावर धूळ, माती आणि किडे-मुंग्यांपासून रक्षण करण्यासाठी वापरलेली औषधे (कीटकनाशके) चिकटलेली असतात. काही वेळा फळ विकणाऱ्या हातांतूनही जंतू फळांवर येतात. या गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत, पण ती आपल्या पोटात गेली तर त्रास होऊ शकतो.

फळे न धुता खाल्ल्याने काय होते?
पोटदुखी
उलटी किंवा जुलाब
ताप येऊ शकतो 
पोटात जंत होण्याची शक्यता वाढते.
म्हणून फळे नेहमी धुवून खावी.
फळे कशी धुवावीत?
फळे वाहत्या नळाच्या पाण्याखाली धरा.
हाताने हळुवार चोळून धुवा, विशेषतः साली असलेली फळे.
सफरचंद, पेरूसारखी फळे धुतल्यावर स्वच्छ फडक्याने पुसून घ्या.
द्राक्षांसारखी छोटी फळे काही मिनिटे पाण्यात ठेवा, त्यात थोडेसे मीठ घाला आणि १० मिनिटानंतर हाताने नीट धुवून ते पाणी टाकून देऊन, फळे खा. 
लक्षात ठेवा फळांची साल खाणार असाल तर फळे धवूनच खा. कारण सालीवरच जंतू , धूळ इ. गोष्टी असतात. ज्या फळांची आपण साल काढतो, उदाहरणार्थ केळे, फणस ही फळे धुवायची गरज नाही. 
तर मुलांनो, कोणतेही फळ सालीसकट खाण्याआधी ते नीट धुवायला विसरू नका.
- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य