Home >> हुप्पा हुय्या >> रामूच्या घरात साप

रामूच्या घरात साप

Story: छान छान गोष्ट |
25th July, 10:36 pm
रामूच्या घरात साप

रामू आपल्या आई-बाबांसोबत शेतात राहत होता. त्यांनी शेताची राखण करण्यासाठी तिथेच एक छोटेसे घर बांधले होते. आजूबाजूला हिरवीगार शेते, झाडे आणि फुलांचा सुगंध दरवळत असे.

रामूचे आई-बाबा खूप कष्टाळू होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते शेतात काम करत. रामूही त्यांना छोटी-मोठी मदत करायचा.

शेताजवळ झुडपे आणि दगड असल्यामुळे त्या भागात सापही राहत असत. तिथं एक एक मोठे वारूळ ही होते.

साप शेतातील उंदीर किंवा इतर जंतू खाण्यासाठी तिथे फिरत असायचे. म्हणून बाबा नेहमी रामूला सांगायचे,

"बाळा, शेतात चालताना नीट पाहायचे. साप दिसला तर त्याच्याजवळ जायचे नाही. लगेच मोठ्यांना सांगायचे."

एके दिवशी रामू अंगणात खेळत होता. अचानक त्याला घराच्या दाराजवळ काहीतरी लांबसर हलताना दिसले. पाहता तो एक दोरा वाऱ्याने हलत असल्यासारखा वाटत होता. तरी तो नीट पाहू लागला.

अरे! तो तर साप होता!

रामूला बाबांचे शब्द आठवले. तो अजिबात घाबरला नाही. सापाजवळ न जाता तो हळूच मागे सरकला आणि मोठ्याने ओरडला,

"आई... बाबा... इकडे साप आहे!"

आई आणि बाबा लगेच बाहेर आले. त्यांनी रामूला सुरक्षित ठिकाणी उभे केले. आवाज केला नाही. बाबांनी गावातील सर्पमित्राला बोलावले.

थोड्याच वेळात सर्पमित्र आला. त्याने काळजीपूर्वक सापाला पकडले आणि जंगलात सुरक्षित सोडून दिले.

रामूने सुटकेचा निःश्वास सोडला.

बाबा हसून म्हणाले, "शाब्बास, रामू! तू धाडस केलेस, पण घाईगडबड केली नाहीस. काही उभारून मारलं नाही. नाही तर साप कुठल्या कुठे धावला असता. कदाचीत घरात ही घुसला असता. तुझ्या हुशारीमुळे, सतर्कतेमुळे सर्वजण सुरक्षित राहिलो." रामूला त्या दिवशी एक महत्त्वाचा धडा मिळाला.

बोध :  साप दिसल्यास त्याच्याजवळ जाऊ नये किंवा त्याला त्रास देऊ नये. शांत राहून मोठ्यांना किंवा सर्पमित्राला बोलवावे. हाच खरा शहाणपणा आहे.

- सोनाली सु. पेडणेकर