
एका सुंदर निसर्गरम्य गावात दोन मित्र राहायचे, श्याम आणि राम. श्याम नावाप्रमाणेच स्वभावाने अतिशय शांत आणि प्रेमळ होता. कोणाला जराही लागलं तरी त्याचं मन हळहळायचं. तो सगळ्यांची खूप काळजी घ्यायचा आणि आपली मैत्री म्हणजे त्याला जीव की प्राण वाटायची.
दुसरीकडे राम होता. राम एकदम बेफिकीर! त्याला खेळायला नवीन मित्र मिळाले की तो जुन्या मित्रांना विसरायचा. कोणाचं मन दुखावतंय की काय, याचा विचार तो कधीच करायचा नाही. आपली मज्जा आणि आपलं खेळणं यातच तो मग्न असायचा.
एक दिवस अचानक श्यामला समजलं की त्याच्या बाबांची बदली खूप लांबच्या शहरात झाली आहे. आता त्यांना हे गाव सोडून कायमचं जावं लागणार होतं. श्यामचं मन भरून आलं. त्याला सर्वात जास्त काळजी वाटली ती रामची. त्याने विचार केला, "आता आपल्याकडे फक्त मे महिन्याची सुट्टी आहे, त्यानंतर मी जाणार. मग मी रामसोबत जास्तीत जास्त वेळ घालवेन."
मे महिन्याची सुट्टी सुरू झाली. बाहेर कडक ऊन होतं, पण श्यामच्या मनात मैत्रीचा ओलावा होता. तो रोज रामला फोन करायचा, त्याच्या घरी जायचा. पण राम? रामच्या घरी त्या सुट्टीत त्याचे काही पाहुणे आले होते. नवीन मित्र मिळाले की राम जुन्या मित्रांना विसरतो, तसंच झालं. राम दिवसभर त्या पाहुण्यांसोबत खेळायला जायचा, रानात फिरायला जायचा. श्यामने कितीही फोन केले, तरी राम ते इग्नोर करायचा. "अरे, तो श्याम कशाला सारखा फोन करतोय? नंतर बोलेन त्याच्याशी," असं म्हणून तो फोन बाजूला ठेवून द्यायचा.
श्यामला खूप वाईट वाटायचं. तो खिडकीत बसून विचार करायचा, "मी तर आता काही दिवसांत हे गाव सोडून जाणार आहे. रामला माझी आठवण येत नसेल का?" श्यामने खूप प्रयत्न केले, पण राम आपल्याच दुनियेत मश्गूल होता.
अखेर तो दिवस आला. श्याम आणि त्याच्या कुटुंबाने सगळं सामान बांधलं. गाव सोडायची वेळ झाली. जड पावलांनी श्याम रेल्वे स्टेशनला निघाला. त्याचं मन रामला शोधत होतं. योगायोग असा की, त्याच वेळी राम सुद्धा आपल्या पाहुण्यांना सोडण्यासाठी बाबांसोबत स्टेशनवर आला होता.
गर्दीत अचानक रामची नजर श्यामवर पडली. श्यामच्या हातात छोटी बॅग होती आणि त्याचे डोळे ओले झाले होते. राम धावत त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, "अरे श्याम, तू इथे काय करतोयस? आणि रडतोयस का?"
श्यामने हुंदका आवरत म्हटलं, "राम, मी आज कायमचा शहर सोडून जातोय. तुला भेटण्यासाठी मी कितीवेळा फोन केले, तुझ्या घरी आलो, पण तू एकदाही माझ्याशी बोलला नाहीस. तुला नवीन मित्र मिळाले आणि तू मला विसरून गेलास. आता मी पुन्हा या गावी कधी येईन माहीत नाही."
हे ऐकताच रामच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला आपली मोठी चूक समजली. त्याला आठवलं की श्याम नेहमी त्याच्यासाठी धावून यायचा, त्याची काळजी घ्यायचा; पण त्याने मात्र मैत्रीपेक्षा तात्पुरत्या मजेला महत्त्व दिलं होतं. रामचेही डोळे भरून आले. त्याला समजलं की माणसं आणि नाती ही खेळण्यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाची
असतात.
रामने धावत जाऊन श्यामला घट्ट मिठी मारली. "मला माफ कर श्याम, मला तुझी किंमत आता समजली आहे," असं म्हणत तो ढसाढसा रडू लागला. इतक्यात श्यामची ट्रेन स्टेशनवर आली. गाडीची शिट्टी वाजली. श्यामला गाडीत चढावं लागलं.
ट्रेन सुरू झाली... श्याम खिडकीतून हात हलवत होता आणि राम स्टेशनवर उभा राहून अश्रू पुसत आपल्या लाडक्या मित्राला निरोप देत होता. रामने आज एक मोठा धडा शिकला होता नवे मित्र जरूर बनवावेत, पण जुन्या आणि जीवाभावाच्या माणसांना कधीही विसरू नये.

- स्नेहा सुतार