डेडलाईनपूर्वी गवंडाळी उड्डाणपूल बांधून पूर्ण करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

तर पावसाळ्याच्या आधी रस्त्याची सर्व कामे पूर्ण करण्याचा जीएसआयडीसीचा मानस.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
1 hours ago
डेडलाईनपूर्वी गवंडाळी उड्डाणपूल बांधून पूर्ण करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

राजधानी पणजी परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या गवंडाळे रेल्वे उड्डाण पुलाचे काम निर्धारित मुदतीपूर्वीच पूर्ण करण्यासाठी राज्य प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या महत्त्वाकांक्षी पुलाचे काम पूर्ण करण्याची मूळ मुदत ऑक्टोबर महिना असली, तरी डेडलाईनपूर्वीच हे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर हॉटमिक्स करणे शक्य नसल्यामुळे मे महिन्याभरात रस्त्यांशी संबंधित सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (जीएसआयडीसी) अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रस्ता सध्या बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, तरीही काही वाहनचालक त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे पुलाच्या बांधकामात मोठे अडथळे निर्माण होवून आणि कामाची गती मंदावते. सध्या पुलाचे खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, कंत्राटदाराने खांबांवर स्लॅब बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्लॅब जोडणीचे कंत्राट हैदराबाद येथील एका विशेष कंत्राटदाराला देण्यात आले आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच खांबांवर स्लॅब बसवण्याचे काम हाती घेतले जाईल.

या कामादरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून रस्ता पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी दोन्ही बाजूंना पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल. तसेच, स्लॅब बसवण्याचे काम रात्रीच्या वेळी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रकाशाची कमतरता व इतर काही तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ४० कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर माशेल, आमोणा, कुडणे, नावेली आणि साखळी तसेच सत्तरी परिसरातील नागरिकांना पणजी गाठणे अधिक सोयीचे आणि जलद होईल. यामुळे नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचेल आणि दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटेल. त्यामुळे संबंधित विभाग आणि कंत्राटदारांनी वेळेचे अचूक नियोजन करून कामे वेगाने पूर्ण करण्यावर विशेष भर देत आहेत.

हेही वाचा