घरट्याच्या रक्षणासाठी घेतला १८ जणांचा चावा

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर विभागातील सर्वात मोठे शैक्षणिक केंद्र असलेल्या मोहनलाल सुखाडिया विद्यापीठात सध्या एका खारीमुळे चर्चेत आले आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून या खारीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांवर अचानक हल्ले चढवून १८ हून अधिक जणांना जखमी केले आहे. या विचित्र संकटामुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
या खारीचे हल्ले प्रामुख्याने मानसशास्त्र विभागाच्या परिसरात होत आहेत. ही खार झाडावरून अचानक चालणाऱ्यांच्या अंगावर झेप घेते आणि चावा घेऊन पुन्हा पसार होते. या दहशतीमुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या विभागाकडे जाणारा रस्ता वापरणे बंद केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कॉलेजच्या डीनच्या हाताचाही या खारीने चावा घेतला आहे.
विद्यापीठ प्रशासनाने या खारीला पकडण्यासाठी 'ॲनिमल एड' बचाव पथकाला पाचारण केले होते. पथकाने कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी पिंजरे लावले, परंतु ही खार अत्यंत चपळ असल्याने प्रत्येक वेळी चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरली. बचाव पथकातील सदस्यांनुसार, खारींचे असे आक्रमक वर्तन दुर्मिळ असून ही खार अजब पद्धतीने वागत आहे.

विद्यापीठ प्रशासनाच्या मते, या खारीने मानसशास्त्र विभागाजवळ आपले घरटे बांधले असावे. आपल्या क्षेत्राचे रक्षण करण्याच्या तीव्र इच्छेपोटी ती समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शत्रू मानून हल्ला करत असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कॉलेजचे असोसिएट डीन नवीन नवाना यांनी सांगितले की, खारीला पकडण्याचे प्रयत्न सुरू असून कॅम्पसमध्ये तिला पाहताच प्रशासनाला कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या कॅम्पसमध्ये फिरणाऱ्या सामान्य खारींकडेही लोक संशयाने आणि भीतीपोटी पाहत असल्याचे चित्र आहे.