सकाळचा नाश्ता फुल्ल्ल ऑन!!!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
04th April, 10:43 pm
सकाळचा नाश्ता फुल्ल्ल ऑन!!!

सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला पटापट तयारी करून शाळेत जायचं असतं. त्यामुळे इतकी घाई होते की तुमच्यापैकी बरेचजण नाश्ता न करताच शाळेच्या बसकडे/गाडीकडे धावतात. मग होतं असं की प्रार्थनेला उभं राहिल्यावर काहींना चक्कर येते, काही जणी तर चक्कर येऊन खाली पडतात. त्यामुळे सकाळी घरी नाश्ता करून  शाळेला गेलात तर दिवसभरासाठी जी ताकद पाहिजे ती शरीर सकाळीच भरून घेतं. जसं प्रवासाला निघण्यापूर्वी आपण गाडीची इंधनाची टाकी फुल करतो की नाही??? तसंच दिवसाची सुरुवात करताना आपल्या या पोटात नाश्त्याचं इंधन सकाळीच भरलं तर गाडी संध्याकाळपर्यंत छान चालू शकते. रोज सकाळी नाश्ता केल्याने स्मरणशक्ती सुधारते, शरीर तंदुरुस्त राहते, आणि दिवसभर एनर्जी चांगली असते.

सकाळचा नाश्ता कसा असावा?

चांगला नाश्ता म्हणजे घरी तयार केलेले पौष्टिक पदार्थ खाणे. त्यात पुढील गोष्टी असाव्यात - 

१. खजूर -२, मनुका ५-६, अंजीर-१ , अक्रोड - १, बदाम - २

२. गरमा गरम मऊ चपाती/फुलका त्यावर मस्त सुगंधी साजूक तूप आणि थोडीशी साखर. याचा छान रोल करून तो खावा.

चपातीबरोबर वेगवेगळ्या भाज्या किंवा कडधान्यांच्या उसळी सुद्धा खाऊ शकता. 

३. शेंगदाणे किंवा वेगवेगळ्या भाज्या घातलेले उपीट

४. खमंग थालीपीठ व चटणी 

५. वेगवेगळ्या प्रकारचे पराठे - मेथी, गाजर, बीटरूट इ. त्याबरोबर गोड लोणचं किंवा खोबऱ्याची चटणी 

६. तांदळाचा , रव्याचा किंवा नाचणीचा पातळ डोसा आणि सांबार किंवा टोमॅटो चटणी.

७. शेवयांचा उपमा

८. इडली आणि चटणी.

९. उन्हाळ्यात पेज आणि कैरीचं लोणचं असा नाश्ता सुद्धा काहींना आवडतो. 

१०. नाचणीचं सत्व, फणसाचं धोणस, शिरा, अननसाचा शिरा, मँगो शिरा इत्यादी. 

अजून कितीतरी आरोग्यदायी पदार्थ तुमच्या घरी करत असतील. हे सगळे पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक असतात. उगाच टीव्हीवर किंवा रील्स बघून सिरीयल्स आणि दूध, कॉर्न फ्लेक्स आणि दूध, फळं आणि दूध, बिस्कीट किंवा पाव आणि दूध, शेव, फरसाण तळलेले, मैद्याचे, किंवा जास्त साखरेचे पदार्थ जसे की ज्यूस, जॅम नाश्त्यात टाळावेत. या पदार्थांमुळे पोषण तर मिळत नाही शिवाय शरीराला वेगवेगळे त्रास होतात. सकाळी भूक लागत नसेल तर तुम्ही रात्री खूप उशिरा जेवत नाही ना याकडे लक्ष द्या. संध्याकाळी लवकर जेऊन रात्री लवकर झोपलात तर सकाळी लवकर उठाल, कडकडून भूक लागेल आणि तुम्ही नाश्ता सुद्धा वेळेवर करू शकाल. हेल्दी नाश्ता करा आणि निरोगी रहा. 


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य