उन्हाळ्यात थंडावा देणारा शीतली प्राणायाम

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
18th April, 11:09 pm
उन्हाळ्यात थंडावा देणारा शीतली प्राणायाम

उन्हाळा आला की काय होते? अंगाची लाही लाही होते, घाम येतो,खूप तहान लागते आणि शाळेतून घरी आल्यावर खूप थकवा जाणवतो ना? मग आईला लगेच सांगता ना, "आई, थंड पाणी दे!" पण आज आपण एक वेगळी गोष्ट शिकूया. श्वासानेच शरीर थंड करता येते. हो, खरंच. याला म्हणतात शीतली प्राणायाम. प्राणायाम म्हणजे एका विशिष्ट प्रकारे श्वास घ्यायची पद्धत. 

उन्हाळ्यात शरीरात काय होते?

उन्हाळ्यात सूर्य खूप तापतो. त्यामुळे आपल्या शरीरातही उष्णता वाढते. उष्णता वाढली की घाम खूप येतो, थकवा येतो, डोके दुखू लागते, उत्साह कमी होतो. म्हणूनच उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

शीतली प्राणायाम म्हणजे काय?

'शीतली'  याचा अर्थ आहे थंड करणारा. हा एक प्राणायामाचा प्रकार आहे जो शरीराला आतून थंड करतो.

शीतली प्राणायाम कसा करायचा?

एका जागी शांत बसा. पाठ सरळ ठेवा. डोळे अलगद मिटा.

जीभ बाहेर काढा आणि दोन्ही बाजूंनी आत वळवा. एक छोटी नळी बनवा.

त्या नळीतून हळूवार श्वास आत घ्या. श्वास घेताना जिभेवर थंडगार वाटेल. 

तोंड बंद करा. नाकातून हळूहळू श्वास बाहेर सोडा.

असे ५ ते १० वेळा करा.

शिरली प्राणायाम कधी करायचा?

सकाळी शाळेत जाण्यापूर्वी

दुपारी घरी आल्यावर

जेव्हा खूप गरम होतं तेव्हा करावा

लक्षात ठेवा

हा प्राणायाम उन्हाळ्यातच करायचा थंडीत करू नये.

सर्दी, खोकला असताना करू नये.

रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर एक तास थांबून करावा.

सुरुवातीला आई-बाबा किंवा योग शिक्षकांसमोर करा.

उन्हाळ्यात शीतली प्राणायाम करून थंड राहा, निरोगी राहा, आनंदी राहा.


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य