चिंटू शहाणा झाला

Story: छान छान गोष्ट |
21st March, 10:35 pm
चिंटू शहाणा झाला

ए​का गावात, एका सुंदरशा घरात चिंटू आणि पिंकी नावाची दोन भावंडे आपल्या आई-बाबांसोबत राहायची. चिंटू होता मोठा आणि पिंकी होती छोटी. शाळेत खूप अभ्यास करून दोघेही थकले होते आणि अचानक एक दिवस धाडधाड धावत 'उन्हाळ्याची सुट्टी' आली! शाळेला कुलूप लागलं आणि मुलांच्या आनंदाला उधाण आलं. गावातली सगळी मुलं संध्याकाळी मैदानात 'आट्यापाट्या' आणि 'क्रिकेट' खेळायला जमायची. पिंकीला पण वाटायचं, आपणही बाहेर जाऊन खेळावं, पण चिंटूचा 'प्लॅन' काही वेगळाच होता.

चिंटूने सुट्टी लागताच सोफ्यावर आपली 'गादी' टाकली होती. त्याच्या एका हातात टीव्हीचा रिमोट, दुसऱ्या हातात बाबांचा मोबाईल आणि समोर आईने बनवलेल्या खमंग चकल्यांचा डबा! चिंटू मनाशीच म्हणाला, "बापरे! किती दिवस अभ्यास केला, आता फक्त मज्जा करायची!" त्याची मज्जा म्हणजे काय? तर सकाळी उशिरा उठायचं, ब्रश न करताच टीव्ही लावायचा आणि त्यावर लागणारी सगळी कार्टून्स—छोटा भीम, मोटू-पतलू, डोरेमॉन—बघून फस्त करायची! कार्टून्स संपले की मोबाईलवर 'धुूम-धडाका' करणारे गेम्स खेळायचे. आई स्वयंपाकघरातून ओरडायची, "चिंटू अरे, बाहेर बघ किती छान ऊन पडलंय, गार वारा सुटलाय, तुझे मित्र बोलावतायत तुला!" पण चिंटू आपला मान सुद्धा हलवत नसे. तो डोळे विस्फारून स्क्रीनकडे बघत म्हणायचा, "आई, हा शेवटचा लेव्हल आहे, हा बॉस जिंकला की गेलोच बघ!" पण तो 'शेवटचा लेव्हल' काही कधी संपायचा नाही.

दुसरीकडे त्याची छोटी बहीण पिंकी मात्र 'सुट्टीची राणी' झाली होती. ती रोज सकाळी 'कुकुचच कू' ऐकून लवकर उठायची. अंघोळ करून, दूध पिऊन ती बागेत धावायची. बागेतल्या गुलाबाच्या, मोगऱ्याच्या रोपांना पाणी देताना ती त्यांच्याशी गप्पा मारायची, "अरे वा! आज तुला नवीन पान आलंय?" तिने यंदा सुट्टीत एका 'मज्जा शिबिरात' नाव नोंदवलं होतं. तिथे रोज नवनवीन गोष्टी शिकायला मिळायच्या. कधी ती कागदाचे रंगीबेरंगी किल्ले बनवायला शिकली, कधी मातीचे छोटे-छोटे माठ आणि बैल बनवले, तर कधी छान-छान गोष्टी आणि गाणी पाठ केली. दुपारच्या वेळेत ती आईसोबत किचनमध्ये 'गोड-गोड' बेसन लाडू वळायला मदत करायची, तर कधी बाबांसोबत बागेत छोटीशी वाफ तयार करून त्यात मेथी आणि कोथिंबीर पेरायची. पिंकीचा दिवस खूप गडबडीचा पण खूप मजेचा असायचा.

बघता बघता सुट्टीचे पंधरा-वीस दिवस उलटले. चिंटूचं काय झालं माहितीये? चिंटू आता आधीसारखा राहिला नव्हता. तो सोफ्यावर लोळून-लोळून एखाद्या फुग्यासारखा फुगला होता! टीव्ही आणि मोबाईलच्या स्क्रीनकडे तासनतास बघून त्याचे डोळे लालबुंद झाले होते आणि सारखे चुरचुरत होते. त्याला आता सोफ्यावरून उठायलाही कंटाळा यायचा. बाबांनी संध्याकाळी चेंडू टाकला की तो पकडायला त्याला धाप लागायची. त्याची चिडचिड वाढली होती आणि त्याचं डोकंही सारखं ठणकायला लागलं होतं. बिचारा चिंटू, सारखा 'आं-ऊं' करत आजारीच पडला!

एके दिवशी पिंकी आनंदाने नाचत-बागडत घरी आली. तिच्या एका हातात आईने दिलेला गोड शिरा होता आणि दुसऱ्या हातात एक चमकणारं सुवर्ण पदक आणि मोठं प्रशस्तीपत्र होतं! 'मज्जा शिबिरात' तिने बनवलेल्या मातीच्या वस्तूंना आणि आई-बाबांना केलेल्या मदतीला 'बेस्ट लिटिल हेल्पर'चं बक्षीस मिळालं होतं! बाबांनी तिला उंचावर उचलून घेतलं, आईने तिचं खूप कौतुक केलं आणि तिला तिच्या आवडीचा शिरा भरवला. घरात आनंदाचं वातावरण होतं.

कपाळावर हात धरून सोफ्याच्या कोपऱ्यात बसलेला चिंटू हे सगळं लांबून बघत होता. त्याला खूप वाईट वाटलं. त्याने स्वतःकडे बघितलं—फुगलेलं पोट, दुखणारे डोळे, थकलेलं शरीर आणि हातातला तो रिकामा मोबाईल! त्याला समजलं की, आपण स्क्रीनच्या खोट्या जगात राहून बाहेरची खरी मज्जा, मैदानावरचा खेळ, आई-बाबांची मदत आणि नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद सगळं गमावलं आहे. त्याला आपली मोठी चूक कळली.

तो हळूच उठून आईपाशी गेला आणि तिचा पदर धरून डोळ्यात पाणी आणून म्हणाला, "आई, मला माफ कर. मी टीव्ही आणि मोबाईलच्या नादात माझी सुट्टी, माझं आरोग्य आणि घरातील आनंद सगळं खराब केलं. मला पिंकीसारखं व्हायचंय! मला पण बागेत खेळायचंय, नवीन गोष्टी शिकायच्यात!"

आईने आपल्या लाडक्या चिंटूला जवळ घेतलं, त्याचे अश्रू पुसले आणि हसून म्हटलं, "अरे वेड्या, आता सुद्धा वेळ गेलेली नाही. चूक कळली, हेच खूप मोठं आहे! चल, उद्यापासून तू आणि पिंकी दोघे मिळून बागेत नवीन बी पेरूत, संध्याकाळी मैदानात धावू आणि मज्जा करू!"

दुसऱ्या दिवसापासून चिंटू पूर्ण बदलला. तो मोबाईल विसरून बागेत मातीशी खेळू लागला. पिंकीसोबत मेथीच्या वाफ्याला पाणी देऊ लागला. त्याने पिंकीकडून कागदाच्या बोटी आणि विमाने बनवायला शिकून घेतली. संध्याकाळी तो मैदानात जोरात धावू लागला, क्रिकेट खेळू लागला. हळू-हळू त्याचं फुगलेलं पोट कमी झालं, डोळ्यांची जळजळ थांबली आणि चेहऱ्यावर छान गुलाबासारखी लाली आली! सुट्टी संपताना चिंटू पुन्हा एकदा फिट आणि खुश झाला होता.

शाळा सुरू झाली तेव्हा चिंटूच्या हातात मोबाईल नव्हता, तर त्याने स्वतः बनवलेलं एक सुंदर कागदी विमान होतं आणि चेहऱ्यावर बाहेरील जगातील आनंदाचं हसू होतं. त्याने ओळखलं होतं की, खरी मज्जा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये नाही, तर बागेतल्या फुलांत, मैदानावरच्या खेळात, आई-बाबांना केलेल्या मदतीत आणि मित्र-मैत्रिणींसोबत घालवलेल्या वेळात असते!


स्नेहा सुतार