चिऊला उमजलेली चूक

Story: छान छान गोष्ट |
18th April, 11:12 pm
चिऊला उमजलेली चूक

ए​का सुंदर छोट्या गावात चिऊ नावाची एक गोड मुलगी राहायची. तिचे डोळे चुणचुणीत आणि हसू अगदी फुलासारखं होतं. चिऊला फिरायची, बागडायची खूप हौस! रोज संध्याकाळ झाली की तिचा एकच धोशा असायचा, "आई... बाबा... चला ना बाहेर फिरायला!"

​आई-बाबाही तिला कधी बागेत, तर कधी नदीकाठी फिरायला न्यायचे. पण कधी कधी आईला घरातली खूप कामं असायची, तर बाबांना ऑफिसच्या लॅपटॉपवर काहीतरी महत्त्वाचं करायचं असायचं. अशा वेळी चिऊचा चेहरा पार उतरून जायचा.

​अशीच एक शनिवारची संध्याकाळ होती. गार वारा सुटला होता आणि बाहेर पाखरं चिवचिवत आपल्या घरट्यांकडे चालली होती. चिऊने बाबांचा हात धरला, "बाबा, चला ना गच्चीवर तरी जाऊया किंवा बागेत तरी नेऊन आणा." बाबा कामाच्या व्यापात होते, ते घाईत म्हणाले, "चिऊ बाळा, थोडा वेळ थांब गं, हे काम झालं की जाऊया." आई पण स्वयंपाकघरात गडबडत होती.

​चिऊला वाटलं, आई-बाबा आपल्याला मुद्दाम नेत नाहीत. तिला खूप राग आला. तिने तिची छोटी ओढणी घेतली आणि कोणालाही न सांगता घराचा दरवाजा हळूच उघडला. "मी माझी एकटीच फिरायला जाईन," असं स्वतःशीच पुटपुटत ती बाहेर पडली.

​बाहेर पडल्यावर सुरुवातीला तिला खूप मजा वाटली. ती फुलपाखरांच्या मागे धावली, रस्त्यावरचे दगड वेचले. चालता चालता ती तिच्या ओळखीच्या गल्लीच्या खूप लांब निघून गेली. हळूहळू अंधार पडू लागला. रस्त्यावरचे दिवे लागले, पण आता चिऊला सगळं नवीन वाटू लागलं. तिने मागे वळून पाहिलं, तर घर कुठेच दिसत नव्हतं!

​"आई गं... बाबा..." चिऊ घाबरली. तिच्या इवल्याशा डोळ्यांतून टपटप पाणी गळू लागलं. एका कोपऱ्यात उभं राहून ती रडू लागली. तेवढ्यात तिथे एक अनोळखी माणूस आला. त्याने चिऊजवळ येऊन विचारलं, "काय झालं बेटा? का रडतेस?"

​चिऊ हुंदके देत म्हणाली, "मला माझ्या घरी जायचंय." तो माणूस गोड बोलून म्हणाला, "अरे, रडू नकोस. तुझं घर मला माहीत आहे. चल, मी तुला तुझ्या आई-बाबांकडे सोडतो." चिऊला वाटलं हा माणूस चांगला आहे, ती त्याच्यासोबत जायला निघाली. पण तो माणूस तिला घराच्या दिशेने न नेता दुसऱ्याच अंधाऱ्या गल्लीकडे घेऊन जाऊ लागला.

​नेमकी त्याच वेळी त्यांच्या घरी कामाला येणाऱ्या रेखा मावशी तिथून घरी निघाल्या होत्या. त्यांची नजर लांबूनच चिऊवर पडली. त्यांना संशय आला की ही चिऊ या अनोळखी माणसासोबत कुठे चालली आहे? रेखा मावशी धावत तिथे आल्या आणि त्यांनी चिऊचा हात धरला.

​"चिऊ! तू इथे काय करतेस?" रेखा मावशींनी कडक आवाजात विचारलं. तो माणूस घाबरला आणि तिथून पळ काढला. रेखा मावशींनी चिऊला जवळ घेतलं, तिचे डोळे पुसले आणि म्हणाल्या, "बाळा, असं कोणालाही न सांगता आणि अनोळखी माणसासोबत कधीच जाऊ नये. चल, तुझे आई-बाबा तुला शोधत असतील."

​इकडे घरी चिऊ दिसत नाही म्हटल्यावर आई-बाबांचे पाय लटलट कापत होते. आई तर रडून रडून बेजार झाली होती. बाबा गल्लीत सगळीकडे तिचा नाव घेऊन ओरडत होते. तेवढ्यात समोरून रेखा मावशी चिऊचा हात धरून येताना दिसल्या. तिला सुखरूप बघताच आई-बाबांचा जीव भांड्यात पडला.

​आईने धावत जाऊन चिऊला कवेत घेतलं. बाबांचेही डोळे भरून आले. त्यांनी रेखा मावशींचे मनापासून आभार मानले. "रेखा ताई, आज तुम्ही नसत्या तर काय झालं असतं कोणास ठाऊक!" बाबा गहिवरून म्हणाले.

​चिऊला आपली चूक उमजली होती. ती आईला घट्ट बिलगली आणि म्हणाली, "आई, बाबा... मला माफ करा. मी पुन्हा कधीच तुम्हाला न सांगता कुठेही जाणार नाही आणि अनोळखी माणसांवर विश्वास ठेवणार नाही."

​आईने तिची गोड पापी घेतली आणि म्हणाली, "माझं शहाणं बाळ आहे!" त्या रात्री चिऊ आई-बाबांच्या कुशीत शिरून शांत झोपली. आता तिला समजलं होतं की, घर आणि आई-बाबांची सोबत हेच जगातलं सगळ्यात सुरक्षित ठिकाण आहे.

​तात्पर्य: रागाच्या भरात घेतलेला निर्णय धोक्याचा ठरू शकतो आणि मोठ्यांना न सांगता कुठेही जाऊ नये.


- स्नेहा सुतार