बापरे! हा उन्हाळा!!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
28th March, 10:38 pm
बापरे! हा उन्हाळा!!

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मजा, खेळ आणि धमाल! काही दिवसातंच उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे. उन्हाळा सुरू झाला की ऊन नकोसं होतं आणि हा सूर्य खरंच आपला मित्र आहे का असा प्रश्न तुम्हाला पडत असेल ना?

सूर्य खरंच आपला मित्र आहे. सूर्यामुळे आपल्याला प्रकाश आणि उष्णता मिळते. झाडे वाढतात, अन्न तयार होते आणि आपल्या शरीराला जीवनसत्व ड म्हणजेच व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडांसाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे सूर्याशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. सूर्यप्रकाशाचा शरीराला स्पर्श झाला असता माणूस निरोगी राहतो. फक्त सूर्याशी योग्य वेळी मैत्री करायला हवी! कडक उन्हात खेळताना किंवा बाहेर काम करताना अनेकदा डोकं दुखतं, चक्कर येते, उन्हाळा नकोसा वाटू लागतो. 

*सूर्यकिरणांचा त्रास कधी होतो?*

दुपारी बारा ते चार या वेळेत सूर्याची किरणे अत्यंत तीव्र असतात. या वेळी उन्हात खेळल्यास —

 डोकेदुखी होऊ शकते आणि चक्कर येऊ शकते

 शरीरातील पाणी कमी होते

 त्वचेवर घामोळ्या आणि फोड येतात

 उष्माघात (Heatstroke) होण्याचा धोका असतो


म्हणून उन्हाळ्यात बाहेर खेळताना किंवा कामासाठी घरा बाहेर पडताना, शाळेतून घरी येताना योग्य काळजी घेतली पाहिजे. 

उन्हात बाहेर जाताना 

कोणती काळजी घ्यावी?

१. वेळ निवडा

सकाळी ७ ते ९ किंवा संध्याकाळी ५ नंतर खेळा. दुपारचं ऊन टाळा.

२. डोक्यावर टोपी घाला

उन्हात बाहेर पडताना टोपी किंवा स्कार्फ डोक्यावर घाला. यामुळे थेट उन्हाचा परिणाम होत नाही.

३. सुती कपडे घाला

उन्हाळ्यात हलके, सैल आणि पांढरे किंवा फिकट रंगाचे सुती कपडे घाला. हे शरीर थंड ठेवतात. घाम शोषून घेतात. 

४. दुपारचे ऊन टाळा:

दुपारी १२ ते ४ या वेळेत सूर्य खूप प्रखर असतो. या वेळेत बाहेर खेळणे टाळा आणि सकाळी किंवा संध्याकाळी खेळा.

५. पाणी योग्य प्रमाणात प्या

खेळताना आपण तहान भूक विसरतो. उन्हाळ्यात मात्र आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी तहान लागली असता खेळ थांबवून पाणी प्या. बाहेर फिरायला जाताना पाणी किंवा लिंबू, कोकम, वाळा, आवळा सरबत घेऊन चला. बाहेरची शीतपेये सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा पिणे टाळा. 

सूर्य आपला मित्र आहे, पण त्याच्या जास्त उष्णतेपासून आपले संरक्षण करणे खूप गरजेचे आहे. योग्य काळजी घेतली तर तुम्ही उन्हाळ्यातही मजेत खेळू शकता आणि निरोगी राहू शकता.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य