कोने - प्रियोळ येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th July, 11:56 pm
कोने - प्रियोळ येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प

फोंडा : कोने - प्रियोळ येथे रविवारी सकाळपासून कोसळलेल्या मुसळधार पावसात दरड कोसळली. यामुळे सुमारे ३ तास फोंडा ते म्हार्दोळ पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. म्हार्दोळ पंचायत कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या दोन घरांत गटार तुंबल्याने पाणी घुसून नुकसान झाले. तसेच म्हाळशी - कुर्टी येथे रस्त्यावर दरड कोसळण्याचा प्रकार घडला.

कोने येथील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी मुसळधार पावसात दरड कोसळली. संपूर्ण रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी जात वाहतूक फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय जवळून वळविली. त्यामुळे वाहतुकीवर अधिक परिणाम दिसून आला नाही. त्यानंतर अग्निशामक दल, म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत तसेच बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला केली. तीन तासानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्वपदावर आली.

म्हाळशी - कुर्टी येथील बगल रस्त्यावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. वाहतूक पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. केरये- खांडेपार येथील चर्च समोरील रस्त्यावर गटार तुंबल्याने सर्वत्र पाणी भरले. त्यामुळे फोंडा येथून खांडेपारच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

म्हार्दोळ येथील पंचायत कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या गुरूदास म्हार्दोळकर व श्यामकांत आकारकर यांच्या घरात पाणी घुसले. सकाळी घरात घुसलेले पाणी दुपारपर्यंत गटार साफ करेपर्यंत राहिल्याने दोन्ही घर मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुपारी जेसीबीच्या सहाय्याने गटार साफ करण्यात आले. तसेच नागझर- कुर्टी येथील नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्याने महादेव मंदिरात पाणी घुसले. दरवर्षी पावसाळ्यात या मंदिरात नाल्याचे पाणी घुसत असते.

कोने - प्रियोळ येथील राष्ट्रीय महामार्गवर दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक पोलिसांची धावपळ उडाली. दरवर्षी या भागात दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे रस्त्याचे चौपादरीकरण करताना बांधकाम खात्याने आवश्यक उपाय करण्याची मागणी लोकांकडून होत आहे.


हेही वाचा