मागील लेखांत आपण ११ व्या अध्यायाच्या सहाव्या श्लोकाचे विस्तृत विवेचन बघितले. आता ७ व्या श्लोकाकडे वळू.
इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि ।।७।।
सरळ अर्थ : हे अर्जुना, आता या माझ्या शरीराच्या ठिकाणी एकत्रित असलेले चराचरासह सर्व जगत् पहा. आणखीही जे काही पाहण्याची इच्छा असेल तेसुद्धा पाहून घे.
विस्तृत विवेचन : हे अर्जुना, कल्पवृक्षाखाली जसे अगणित तृणांकुर उगवून वाढावेत तशा माझ्या या विश्वरूपाच्या रोमांच्या मुळात या अनंत सृष्टी कशा निर्माण होऊन वाढत आहेत, ते बघ. झरोक्याच्या किरणात सूक्ष्म धुळीचे असंख्य कण जसे सतत खालीवर होताना दिसतात तसे माझ्या अवयवांच्या सांध्यासांध्यांमधून अपार ब्रह्मांडाचे भ्रमण चालू असलेले तुला दिसेल. इथे माझ्या अंगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तुला वेगवेगळ्या विश्वांची उत्पत्ती होताना बघता येईल आणि विश्वाच्याही पलीकडे काय आहे, हे तुला जर पहायचे असेल, तर तेही सगळे पाहून घे. माझ्या या देही त्याचीही वाण नाही. विश्वरूपधारी श्रीकृष्ण अर्जुनाला असे म्हणाल्यावर आपण हे सगळे बघत आहोत किंवा नाही, याबद्दल काहीही न सांगता अर्जुन मौन होऊन तसाच स्तब्ध राहिला. आश्चर्याने तो असा स्तब्ध का राहिला आहे, हे जेव्हा कृष्ण बघू लागला, तेव्हा तो अर्जुन विश्वरूप पाहण्याच्या उत्कट इच्छेचे लेणे लेवून तसाच थांबलेला असल्याचे त्याच्या लक्षात आले.
न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा।
दिव्यं ददामि ते चक्षु: पश्य मे योगमैश्वरम् ।।८।।
सरळ अर्थ : परंतु, तू मला या आपल्या प्राकृत चक्षूंनी पाहण्यास नि:संशय समर्थ नाहीस. याकरिता मी तुला दिव्य अर्थात् अलौकिक चक्षू देतो. त्यांनी तू माझा प्रभाव व योगसामर्थ्य पहा.
विस्तृत विवेचन : त्यावर ते आकळून तो (श्रीकृष्ण) मनातच म्हणाला की पार्थाची उत्कंठा अजिबात ओहटलेली (कमी झालेली) दिसत नाही आणि तसेच त्याला अजूनही नित्य-सिद्धानंद-मार्ग सापडलेला दिसत नाही. कारण विश्वरूप तर मी दाखवले, पण ते याला कळलेच नाही. श्रीकृष्णाने तसे अर्जुनाला बोलूनही दाखवले. अर्जुन चतुर होता. तो म्हणाला की यात कमीपणा कुणाला येतो सांगा. चंद्रामृत सेवण्याची अपेक्षा बगळ्याकडून कशी करता? देवा, तुम्ही आंधळ्याला आरसा दाखवून यात तुझे रूप पहा असे कसे म्हणू शकाल? किंवा बहिऱ्या माणसाला गोड गाणे कसे ऐकवाल? बेडकाला फुलामधील केसर खाऊ घालण्यात काय हशील आहे? तेव्हा आता तुम्ही दाखवलेले विश्वरूप मी बघू शकलो नाही, याचा दोष कुणाला देऊन रागवायचे कुणावर, हे अंतरी स्वतःलाच विचारून पहा.
जे इंद्रियांना गोचर नाही असे शास्त्रे म्हणतात आणि जे फक्त ज्ञानदृष्टीच्याच वाट्याला आलेले आहे, ते विश्वरूप तुम्ही चर्मचक्षूंपुढे ठेवले आहे. मग मी काय आणि कसं बघावं अशी तुमची अपेक्षा आहे? पण तुमचे हे न्यून माझ्यासारख्याने न बोलता ते आपण स्वतःच सोसलेले बरे.
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की अर्जुना, हे जे तू बोलत आहेस, ते मला पूर्णतः मान्य आहे. मी जेव्हा तुला विश्वरूप दाखवायला प्रवृत्त झालो, तेव्हाच तुला आधी दिव्य-ज्ञान-दृष्टी द्यायला हवी होती. पण प्रेमभरात बोलताबोलता मला त्याचा विसर पडला. हे धनंजया, जमीन नीट चोखाळल्याशिवाय त्यात बीज पेरून उपयोग नाही, हे माझ्या लक्षात आले नाही. पण आता मी ती दृष्टी तुला देईन, ज्या योगे तू माझे विश्वरूप पाहशील आणि त्याचा व्यवस्थित अनुभव घेशील. जो वेदान्ताला जाणण्यासारखा आहे, जो सर्व लोकांचा आद्य आहे व जो जगाचे आराध्य दैवत आहे, अशा त्या कृष्णनाथाने कुंतीपुत्र पार्थाला भक्त-प्रेमोल्हासाने असे सांगितले.
संजय उवाच
एवमुक्त्वा ततो राजन्महामहायोगेश्वरो हरि:। दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ।।९।।
सरळ अर्थ : तेव्हा संजय, (धृतराष्ट्राला) म्हणाला हे राजन्, महायोगेश्वर व सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंतांनी असे सांगून मग अर्जुनाला परम ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखविले.
विस्तृत विवेचन : महाभारत युद्ध घरात बसून प्रत्यक्ष थेट बघणारा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार (चक्षुर्वै सत्यम्) संजय होता. तो धृतराष्ट्रास म्हणाला की हे कौरवेशा मला एका गोष्टीचे परत परत फार आश्चर्य वाटते की या त्रैलोक्यात लक्ष्मीहून दुसरी भाग्यवती कोणी असेल काय? किंवा या जगात श्रुतीशिवाय दुसरी कुठली खूण वर्तन करण्याजोगी असेल? किंवा सेवकांमधे शेषनागाहून थोर दुसरा कोण असू शकेल? देवासाठी हव्यासाने शिणणारे असे गरुडासारखे स्वामीकाजाला वाहून घेणारे अन्य कोण योगीजन असू शकतील का?
पण, या सगळ्यांना बाजूला सारून तो देव आज पांडवांचा दास झाला आहे. बघा ना, जन्मल्यापासून त्यांनाच संपूर्ण कृष्णप्रेम लाभले आहे. जसे कामी-जन स्त्रियेच्या आधीन होतात तसा हा कृष्ण आज पार्थाधीन झाला आहे. शिकवून पढविलेला पक्षी जसा बोलत असेल तसा तो आज अर्जुनाशी बोलत आहे. एकूणच आज पार्थाच्या भाग्याला एवढा उत्कर्ष कसा लाभत आहे, काही कळेनासे झाले आहे. पूर्ण परब्रह्म भोगण्याइतकी भाग्यवती आज याची दृष्टी झाली आहे. तो देव अर्जुनाचे शब्द कसे झेलत आहे बघा. त्याच्या सगळ्या हौशी तो पुरवायला लागला आहे. पार्थ रागावला तरी तो निमूटपणे सहन करत आहे आणि रुसला तरी त्याला समजावत आहे. देवाला पार्थाचे वेड लागले आहे, हे आजचे नवल बघा महाराज.
जन्मल्यापासून इंद्रिये ताब्यात ठेवणारे शुकादिकांसारखे जे ऋषिवर्य योगीराज आहेत, जे श्रीहरीचे भाट होऊन त्याच्या रासक्रीडेचे अवीट वर्तन करीत असतात व समाधीत ज्याचे अक्षय ऐश्वर्य भोगत असतात तो देव आज पार्थाच्या एवढा आधीन झालाय याचे मला नवल वाटत आहे. (क्रमशः)

- मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.) मो. ९४२३८८९७६३


