हुथींच्या कारवाया पोहोचल्या सौदी अरेबियापर्यंत

Story: विश्वरंग |
15th September, 07:55 pm
हुथींच्या कारवाया पोहोचल्या सौदी अरेबियापर्यंत

पश्चिम आशियातील संघर्ष आता एका देशाच्या सीमेत राहिलेला नाही. इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर येमेनमधील हुथींच्या कारवाया सौदी अरेबियापर्यंत पोहोचल्या आहेत. सौदीच्या दक्षिणेकडील भागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले होत असताना, लाल समुद्राच्या प्रवेशद्वाराजवळील महत्त्वाच्या भागांवर हुथींची पकड वाढत आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ सौदी-येमेन संघर्षाचा न राहता संपूर्ण मध्यपूर्वेच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी गंभीर बनला आहे.

सप्टेंबरच्या सुरुवातीपासून हुथींनी सौदीतील अब्हा, खमिस मुशैत, जिझान आणि नजरान या भागांना लक्ष्य केल्याचा सौदीचा आरोप आहे. या हल्ल्यांत ७३ जण जखमी झाल्याचे सौदी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर संघर्ष आणखी तीव्र झाला.

हुथींच्या दृष्टीने हे हल्ले सौदीच्या येमेनमधील कारवायांना दिलेले प्रत्युत्तर आहे. मात्र प्रत्यक्ष परिणाम पाहिला तर सौदीच्या नागरी आणि आर्थिक पायाभूत सुविधांवर वाढता धोका निर्माण होत आहे. तेल प्रकल्प, लष्करी तळ आणि वाहतूक व्यवस्था यांना लक्ष्य केल्यास त्याचा परिणाम केवळ स्थानिक सुरक्षेवर होत नाही, तर जागतिक ऊर्जा बाजारावरही होऊ शकतो.

सध्याच्या घडामोडींतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे मोखा शहर आणि बाब-अल-मंदेब परिसरातील हुथींची वाढती पकड. १० सप्टेंबरला हुथींनी लाल समुद्रावरील रणनीतिक मोखा बंदर शहर ताब्यात घेतल्याचे वृत्त आले. त्यानंतर त्यांच्या हालचाली बाब-अल-मंदेबच्या दिशेने वाढल्या असून मायुन किंवा पेरिम बेटावरही त्यांची उपस्थिती वाढल्याचे वृत्त आहे. हा जलमार्ग लाल समुद्राला एडनच्या आखाताशी जोडतो आणि जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे परिस्थितीचा खरा धोका समोर येतो. आधीच होर्मुझ सामुद्रधुनीतील अस्थिरतेमुळे ऊर्जा वाहतुकीवर दबाव आहे. आता बाब-अल-मंदेबही असुरक्षित झाला, तर आखाती तेल आणि लाल समुद्रातील व्यापारमार्ग दोन्ही एकाच वेळी धोक्यात येतील. सौदीसाठी हा मोठा सुरक्षा प्रश्न आहे, कारण लाल समुद्रमार्ग हा निर्यातीसाठी महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे. अलीकडील हल्ल्यांनंतर सौदीच्या तेलपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाल्याचे अहवाल समोर आले आहेत.

या संघर्षात इराणची भूमिकाही दुर्लक्षित करता येणार नाही. तेहरान हुथींवर थेट नियंत्रण असल्याचा आरोप नाकारतो, पण हुथींना शस्त्रे, निधी आणि तांत्रिक मदत मिळत असल्याचे विविध अहवाल सांगतात. त्यामुळे सौदीवर होणारे हल्ले हे अप्रत्यक्षपणे इराण-अमेरिका संघर्षाचा विस्तार मानले जात आहेत.