पणजी : राज्य सरकारच्या विविध खात्यांची २४२६ कोटी रूपयांची थकबाकी येणे बाकी आहे. थकबाकी मिळवण्यासाठी सरकार विविध उपाय करत आहे.
सर्वाधिक ८७५ कोटी रुपये थकबाकी व्यावसायिक कर खात्याकडून येणे बाकी आहे. यात व्हॅट, सीएसटी तसेच हरित सेसचा समावेश आहे. या खात्याला ७०२९ जणांनी थकबाकी दिलेली नाही. वीज खात्याच्या सुमारे २ लाख ग्राहकांनी सुमारे ४३५ कोटी रुपये देणे बाकी आहे.
थकबाकीदारांमध्ये मध्ये विविध श्रेणीतील ग्राहकांचा समावेश आहे.
थकबाकी मिळवण्यासाठी वीज खात्यातर्फे थकबाकीदारांना नोटीस पाठवणे, त्यांची वीज जोडणी तात्पुरती अथवा कायमस्वरूपी तोडणे असे उपाय केले जात आहेत. वाहतूक खात्याला ३६१ जणांनी मिळून ३७८ कोटी रुपये देणे बाकी आहेत. याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. यातील काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.
गृह खात्याकडे व्याजासकट २३० कोटी रुपये थकबाकी येणे बाकी आहे. थकबाकीदारांमध्ये कॅसिनो, हॉटेल कंपन्यांचा समावेश आहे. याबाबत ‘कारणे द्या नोटीस’ बजावण्यात आली आहे. तर काही प्रकरणे न्याय प्रविष्ट आहेत.
खाण खात्याकडे २३७ कोटी रुपये येणे शिल्लक आहे. याबाबत सूचना जारी करण्यात आली आहे. याशिवाय बंदर कप्तान खात्याकडे ३.२६ कोटी रुपये येणे शिल्लक आहेत. ही रक्कम जमा करून घेण्याबाबत खात्याकडून प्रकिया सुरू करण्यात आली आहे.
तर लॉटरी खात्याकडे ९ कोटी रुपये येणे बाकी आहेत. पेयजल खात्याकडे सुमारे ६० हजार ग्राहकांनी १९० कोटी रुपये देणे बाकी आहे. खात्याने या ग्राहकांची
पाणी जोडणी तोडली आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय खात्याने ‘वन टाइम सेटलमेंट’ योजना देखील सुरू केली आहे.
तर परवाने रद्द
अधिकृत माहितीनुसार अबकारी खात्याकडे ७ कोटी रुपये येणे शिल्लक आहेत. याबाबत खात्याने नोटीस जारी केल्या आहेत. मद्य विक्री परवान्यांचे वेळेत नूतनीकरण न करणाऱ्यांचा परवाना रद्द करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. उत्पादक कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.