गेल्या दहा-बारा वर्षांत गोव्यातील रस्त्यांचे जाळे अधिक विस्तारले व सुधारले. डांबरी रस्त्यांची जागा काँक्रिटच्या रस्त्यांनी घेतली, तर जुन्या पुलांच्या व रस्त्यांच्या बाजूला नवे पूल आणि फ्लायओव्हर उभे राहिले. गोवा बदलत गेला. लोकवस्ती वाढत गेली. राज्यात स्थानिक वाहनांबरोबरच रोज ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांचा विस्तार, चांगले रस्ते, पूल, फ्लायओव्हर या गोष्टी गोव्यात अत्यावश्यक झाल्या. जागा मिळणे कठीण होत असल्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी फ्लायओव्हर तयार करून रस्त्यांवरची वाहनांची गर्दी कमी करण्यात येते. काणकोणमधील मनोहर पर्रीकर मार्ग, जुवारी नदीवरील नवा पूल, पत्रादेवी ते पोळे महामार्गातील बदल आणि विस्तार, गवंडाळी पूल, गवंडाळी येथे उभारला जात असलेला नवा फ्लायओव्हर, मोपाला जोडणारा लिंक रोड, बांबोळी ते गोवा वेल्हा दरम्यानचा फ्लायओव्हर, अनमोड घाट रस्त्याचा विस्तार, अटल सेतू, पर्वरीचा नवा फ्लायओव्हर अशा अनेक नव्या प्रकल्पांनी गोव्याच्या पायाभूत सुविधांचे चित्र पालटून टाकले आहे. बोरीचा नवा पूलही प्रस्तावित आहे. असे अनेक प्रकल्प अजून सुरू व्हायचे आहेत. डिचोली, अस्नोडा बायपास यासारखे अनेक नवे रस्ते तयार होत आहेत किंवा झाले आहेत. अनेक नवे मार्ग, पूल, रस्त्यांचा विस्तार होणार असल्यामुळे पुढील काही वर्षेही गोव्यात ही विकासकामे सुरूच राहतील. दळणवळणासाठी रस्त्यांचे जाळे विकसित करण्यासह अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुधारणा करणे, वाहतूक नियमभंग होऊ नये यासाठी सीसीटीव्हीचे नेटवर्क तयार करणे यांसारख्या अनेक सुधारणा गोव्यात होत आहेत.
पर्वरी फ्लायओव्हरचे उद्घाटन केल्यानंतर केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यासाठी अजून काही कामे मंजूर केली असल्याचे नमूद केले. विशेष म्हणजे त्यात बोरी पुलासाठी २ हजार कोटी रुपये तर अनमोड ते मोले रस्त्यासाठी ४२०० कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले आहे. गोव्यातील सहा रस्त्यांची कामे झाडे तोडता येत नाहीत म्हणून अडून पडलेली आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. गोव्यासाठी केंद्राकडून भरघोस मदत होत असताना आणि अपघात टाळण्यासाठी, सुरक्षित वाहतुकीसाठी रस्त्यांचा विस्तार आणि रस्त्यांमध्ये सुधारणा आवश्यक असताना त्यात अडथळे येत आहेत, हे दुर्दैवीच आहे. काही ठिकाणी लोकवस्तीतून रस्ता जात असल्यामुळे विरोध होत आहे. पण रस्ते हे सर्वांसाठी आहेत. अरुंद रस्त्यांमुळे होणारे अपघात आणि त्यात जाणारे जीव यांचाही विचार करण्याची गरज आहे. समाजासाठी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी रस्त्यांची गरज आहे. अशा प्रकल्पांना विरोध व्हायला नको. दुर्दैवाने सरकारकडूनही लोकांना योग्य माहिती न दिली गेल्यामुळे लोक सुरुवातीलाच विरोध दर्शवतात. कुठल्याही प्रकल्पाची माहिती लोकांना देणे, त्या प्रकल्पाची का गरज आहे हे पटवून देणे हे सरकारचे काम असते. त्या कामात सरकारचे अधिकारी अपयशी ठरतात, त्यामुळे बहुतेक ठिकाणी सरकारी कामांना विरोध होतो. रस्ते, पूल, रेल्वे रुळ, वीज वाहिन्या, शैक्षणिक प्रकल्प अशा गोष्टींना विरोध होऊ नये. हे बदल समाजासाठी आवश्यक असतात. मात्र सरकारनेही अशा प्रकल्पांसाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचे असते. लोकांना माहिती देणे, त्यांची मते जाणून घेणे, आवश्यक ते बदल करणे अशा गोष्टी करण्याचे काम सरकारचे असते. गोव्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे बंद आहेत किंवा ती हातीच घेतलेली नाहीत. साखळी ते केरी चोर्लाघाटपर्यंतचा रस्ता, बोरी पूल, भोम येथून जाणारा महामार्ग, रेल्वे दुपदरीकरण, आयआयटी अशा अनेक प्रकल्पांना गोव्यात विरोध झाला. अनेक कंपन्यांना गोव्यात वेगवेगळ्या भागांत विरोध झाला. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘आयटी हब’सारख्या प्रकल्पालाही विरोध झाला. यातील बऱ्याच गोष्टी नंतर पुढे मार्गी लागलेल्या नाहीत. पर्वरीच्या फ्लायओव्हरलाही पूर्वी विरोध झाला होता, पण विरोध करणाऱ्यांपैकीच काही लोक उद्घाटनाला अग्रस्थानी होते. गोव्याच्या हितासाठी असलेल्या गोष्टींना विरोध न करता उलट काही प्रकल्प गोव्यात किंवा आपल्या परिसरात आणण्यासाठी जनतेने पुढाकार घेऊन सरकारवर दबाव आणायला हवा. तेव्हाच गोवा खऱ्या अर्थाने विकसित होईल.


