गिलगित निवडणुकीत लष्कराचा हस्तक्षेप?

Story: विश्वरंग |
04th September, 10:42 pm
गिलगित निवडणुकीत लष्कराचा हस्तक्षेप?

पाकिस्तानच्या गिलगित-बाल्टिस्तानमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये सरकार आणि लष्कराविरोधात वाढत असलेल्या असंतोषामुळे पाकिस्तानी लष्कराच्या अडचणी वाढल्या आहेत. या परिस्थितीत निवडणुकीचे निकाल आपल्या मनाप्रमाणे लागावेत आणि या भागावरील नियंत्रण कायम राहावे, यासाठी जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील लष्कर विरोधी नेत्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप केला जात आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)च्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गिलगित-बाल्टिस्तानमधील हुंजा येथे पीटीआयचे खैबर-पख्तूनख्वा अध्यक्ष जुनैद अकबर खान, नॅशनल असेंब्लीचे सदस्य सलीमुर रहमान आणि सय्यद महबूब शाह यांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले. या नेत्यांकडे आवश्यक ‘एनओसी’ नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्यांना तातडीने परिसर सोडण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे. या कारवाईमुळे लष्कर आणि सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे.

निवडणुकीत प्रतिबंधित दहशतवादी संघटनांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ (टीएलपी) ही संघटना या निवडणुकीत उतरली आहे. पाकिस्तानने १९९७ च्या दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत टीएलपीवर अधिकृतपणे बंदी घातली होती. दरम्यान, पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांना राजकीय पक्षांच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा हा पहिलाच प्रकार नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. यापूर्वी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित घटकांना ‘मिल्ली मुस्लिम लीग’ या राजकीय पक्षाच्या माध्यमातून राजकीय प्रक्रियेत आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला होता. आता टीएलपीच्या माध्यमातून गिलगित-बाल्टिस्तानमधील स्थानिक नागरिकांच्या असंतोषाला पर्यायी राजकीय दिशा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

गिलगित-बाल्टिस्तान विधानसभा निवडणुकीत एकूण ४०३ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी २७२ उमेदवार अपक्ष आहेत. यातील काही उमेदवारांना सरकार आणि प्रशासनाचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप केला जात आहे. याशिवाय पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे (पीएमएल-एन) २२ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) २३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या प्रमुख पक्षांच्या काही उमेदवारांनाही पडद्यामागून लष्कराचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सुदेश दळवी