माझ्या गोव्याच्या जुन्या आठवणींपैकी सर्वात सुंदर आठवण म्हणजे लोक दुसऱ्याच्या देवासाठी आदराने थांबायचे. रस्त्याच्या कडेला असलेल्या देवळाजवळ किंवा क्रॉसजवळ बस कंडक्टर ड्रायव्हरला गाडी हळू करायला सांगायचा, जेणेकरून तिथे फुले वाहता येतील. देवळासमोरून जाताना कॅथलिक माणूस आपसूकच मान झुकवायचा आणि चर्चसमोरून जाताना हिंदू माणूस हात जोडायचा. माझ्या गावात जेव्हा मेरीची मिरवणूक निघायची, तेव्हा हिंदू कुटुंबे रस्त्यावर फुले ठेवायची. याला कोणी 'धार्मिक सलोखा' असे मोठे नाव दिले नाही. कोणी याचे आयोजन केले नव्हते. ही फक्त गोव्याची सहज आणि नैसर्गिक जीवनशैली होती.
मी अशा गोव्यात लहानाचा मोठा झालो, जिथे धर्म सर्वत्र होता; पण आपली धार्मिक ओळख दाखवण्याची किंवा तिची जाहिरात करण्याची गरज कोणालाच वाटत नव्हती. एका बाजूला चर्चच्या घंटा वाजायच्या, तर दुसऱ्या बाजूला देवळाच्या घंटांना प्रतिसाद मिळायचा. जत्रा, फेस्त, नवस आणि पूजा हे प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग होते. माझे हिंदू मित्र आमच्या कॅथलिक घरात अगदी सहज यायचे आणि आम्हीही त्यांच्या घरी तितक्याच हक्काने जायचो. आजही, अनेक दशकांनंतरही आमचे हे संबंध तसेच आहेत. आम्ही एकत्र खातो, एकत्र प्रवास करतो, एकत्र आनंद साजरा करतो आणि एकमेकांच्या दुःखात सहभागी होतो.
म्हापश्याच्या 'मिलाग्रिस सायबिण'च्या परंपरेत आपल्या या सामायिक वारशाचे सर्वोत्तम रूप दिसते. तिथे हिंदू आणि कॅथलिक समुदाय वर्षानुवर्षे एकत्र येतात. ही परंपरा सरकारने शिकवलेल्या सहिष्णुतेमुळे टिकून राहिलेली नाही, तर सामान्यांना हे ठाऊक होते की, आपण आपला धर्म मनापासून पाळूनही दुसऱ्याच्या धर्माचा आदर करू शकतो.
माझ्या बालपणात धर्म सगळीकडे होता, पण मला कधीही धर्मांतर झाल्याचे आठवत नाही. आमच्या कॅथलिक शाळांमध्ये शिकणाऱ्या हिंदू किंवा मुस्लिम मित्रांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न कोणत्याही पाद्री किंवा नन्सने केल्याचे मला आठवत नाही. हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या अनेक पिढ्या कॅथलिक शाळांमधून शिकून बाहेर पडल्या आणि प्रत्येकाचा आपापल्या श्रद्धांवर पूर्ण विश्वास राहिला.
आपले धर्म वेगवेगळे असले, तरी आपला इतिहास एकमेकांशी खोलवर जोडलेला आहे. अनेक हिंदू आणि कॅथलिक कुटुंबांचे पूर्वज एकच आहेत. शतकांपूर्वी कुटुंबातील एका शाखेने धर्मांतर केले असेल, तर दुसरी हिंदूच राहिली. नावे बदलली, रीतीरिवाज बदलले, पण रक्ताची नाती आणि आपुलकी कधीच संपली नाही. म्हणूनच, गोवा मंत्रिमंडळाने जेव्हा 'गोवा बेकायदेशीर धर्मांतर बंदी विधेयक, २०२६' ला मंजुरी दिली, तेव्हा एक साधा प्रश्न निर्माण होतो, आपण नेमकी कोणती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत?
जबरदस्तीने, फसवणुकीने किंवा भीती दाखवून केलेल्या धर्मांतराचे समर्थन कोणताही सुजाण माणूस करणार नाही. असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण कोणतेही नवीन कायदे हे पुराव्यांवर आधारित असले पाहिजेत. जर गोव्यात मोठ्या प्रमाणावर जबरदस्तीने धर्मांतर होत असेल, तर सरकारने त्याचे पुरावे दाखवावेत. किती तक्रारी आल्या? किती तपास झाले? अशा नवीन आणि कठोर कायद्याची गरज भासावी, अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे?
येथे एक मोठा आणि महत्त्वाचा सिद्धांतही आहे. श्रद्धा ही पूर्णपणे व्यक्तिगत गोष्ट आहे. कोणत्याही वयात व्यक्तीला हिंदू, कॅथलिक किंवा मुस्लिम राहण्याचे, दुसरा धर्म स्वीकारण्याचे किंवा कोणताही धर्म न मानण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. जर दोन वेगवेगळ्या धर्मांच्या व्यक्तींनी प्रेमाने विवाह करायचा निर्णय घेतला, तर तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. त्यात राजकारणी, धर्मगुरू किंवा सरकारने हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नाही.
धार्मिक स्वातंत्र्याचा अर्थ फक्त जन्माने मिळालेल्या धर्मातच राहणे असा होत नाही, तर तो धर्म सोडण्याचे स्वातंत्र्यही त्यात समाविष्ट असते.
लहानपणी मी माझ्या एका कॅथलिक मित्राच्या कुटुंबासोबत प्रियोळ येथील मंगेशी मंदिरात गेलो होतो. त्यांच्या नवीन गाडीचे चर्चमध्ये पूजन झाले होते, तरीही ते मंगेशीच्या दर्शनाला गेले होते. दोन्ही ठिकाणी आशीर्वाद घेण्यात कोणालाच काही वावगे वाटले नाही. तिथे पूजेपूर्वी पुजाऱ्याने विचारले, "येथे कुठ्ठाळी येथील कोणी आहे का?" कारण मंगेशीची मूळ मूर्ती पूर्वी आमच्या कुठ्ठाळी गावात होती. मला माझ्या गावाचा हा इतिहास माहिती नव्हता, पण शेजाऱ्यांनी मला पुढे केले आणि पुजाऱ्याने मला आशीर्वाद दिला.
त्या एका प्रसंगाने गोव्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. शतकांपूर्वी जेव्हा मंगेशीचे मंदिर कुठ्ठाळीवरून प्रियोळला हलवले गेले, तेव्हा कुटुंबेही विखुरली गेली. काही आपली श्रद्धा घेऊन नवीन ठिकाणी गेले, तर काही तिथेच राहून नंतरच्या काळात कॅथलिक झाले. इतिहास आणि काळाने आपल्या प्रार्थनास्थळांना वेगळे केले असले, तरी ते माणसांमधील आपुलकी आणि नाते कधीच तोडू शकले नाहीत.
पोर्तुगीज राजवटीत मंदिरे पाडली गेली, धर्मांतरे झाली, हा इतिहास वेदनादायी आहे. तो इतिहास आपण नाकारू शकत नाही. पण इतिहासाचे स्मरण ठेवणे म्हणजे भूतकाळाचे कैदी बनून राहणे नव्हे. आज गोव्यात पोर्तुगीज राज्यकर्ते उरलेले नाहीत, इथे फक्त गोमंतकीय राहतात.
मग आज या नव्या कायद्याची गरज का भासत आहे? गोवा आपली स्वतःची एखादी खरी समस्या सोडवत आहे, की देशाच्या इतर भागांतील राजकीय आणि धार्मिक मतभेद इथे आणले जात आहेत?
काायदे फक्त गुन्ह्यांना शिक्षा देत नाहीत, तर ते समाजात भीतीही निर्माण करतात. सरकारने जेव्हा आपल्याला आपल्या शेजाऱ्याकडे आधी हिंदू, कॅथलिक किंवा मुस्लिम म्हणून पाहायला शिकवले, तेव्हा आपल्यातील विश्वासाचे नाते तुटू लागते.
जर गोव्यात खरोखरच जबरदस्तीने धर्मांतर होत असेल, तर पुरावे द्या, पीडितांचे संरक्षण करा आणि दोषींवर कारवाई करा. पण जर तसे नसेल, तर गोव्याने अस्तित्वातच नसलेल्या आजारावर औषध उपचार करण्याचे टाळले पाहिजे.
आपला वारसा केवळ 'धार्मिक सहिष्णुता' नाही, तर तो एकमेकांबद्दलचा गाढ विश्वास आहे. सरकारने हा गोवा बनवलेला नाही, तर पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या सामान्य गोमंतकीयांनी तो घडवला आहे. सत्ताधाऱ्यांनी हा सुंदर वारसा आणि विश्वास नष्ट होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
गोव्याच्या पारंपरिक सलोख्याला भीतीचे ग्रहण लावू नका.
- ज्योकिम गोएस
(लेखक अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक असून मूळचे कुठ्ठाळी-गोवा येथील आहेत.)


