सतत 'घर चलो' अभियान राबवून राजकारणात रमलेल्या भाजपला पंचतारांकित असे मुख्यालय गोव्यातील प्राईम लोकेशन असलेल्या कदंबा पठारावर मिळाले आहे. साधे कार्यालय वगैरे नव्हे, तर तारांकित असे हे मुख्यालय अनेक सोयीसुविधांनी सज्ज आहे. गोव्यावर अनेक वर्षे सत्ता केलेल्या मगो, काँग्रेसला स्वतःचे कार्यालय खरेदी करणे कधी जमले नाही. मगोने शहरात अनेकदा आपली जागा बदलली आणि शेवटी सांतिनेज परिसरात एका जागेत स्थिरावला. पण त्या कार्यालयासाठी आशीर्वाद ढवळीकर बंधूंचेच आहेत. काँग्रेसची परिस्थिती तर त्याहून बिकट. अनेक वर्षे जुन्या जागेत काँग्रेसचे कार्यालय बांदोडकर मार्गावर आहे. एका माजी मंत्र्याने जो आता भाजपमध्ये आहे, ते कार्यालय एकदा फर्निश केले होते. त्यानंतर माजी अध्यक्ष अमित पाटकर यांनी कार्यालयाला थोडी झळाळी आणली. नवे कार्यालय खरेदी करणार होते, इतक्यात काँग्रेसने आपला अध्यक्ष बदलला. गोवा फॉरवर्डने विजय सरदेसाई यांच्या आशीर्वादाने पणजीत कांपाल परिसरात एक चांगले कार्यालय घेतले. पण हा पक्ष सध्या सरदेसाई यांच्यापुरताच मर्यादित आहे. आरजीपीचे कार्यालय होते, पण त्या पक्षाची शकले पडली आहेत. इतर पक्षांची कार्यालये भाड्याच्या जागेत आहेत. भाजपचे पणजीत आत्माराम बोरकर रस्त्यावर स्वतःचे कार्यालय होते. त्यापूर्वी भाजपनेही अनेक ठिकाणी कार्यालये हलवली. पण कामात सातत्य, पक्षबांधणी, केडरची वाढ यातून भाजपला गोव्यात प्रारंभी २००० साली सत्ता मिळाली. ती जेमतेम चार वर्षे टिकली. त्यानंतर २०१२ मध्ये जी सत्ता मिळाली, ती भाजपने हातातून निसटू दिली नाही. कोणत्याही मार्गाने सत्तेत राहण्यासाठी भाजपचे प्रयत्न असतात आणि सलग तीनवेळा भाजप सत्तेत आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये विधानसभेची निवडणूक होईल, त्यामुळे त्यापूर्वी भाजप आपल्या 'तारांकित' मुख्यालयात प्रवेश करत आहे, हे पक्षासाठी विशेष आहे. एवढे मोठे भव्य मुख्यालय भाजपने उभारल्यामुळे साहजिकच इतर राजकीय पक्षांचे मनोबल खचण्यासारखे आहे. इतर पक्ष भाजपला सत्तेबाहेर करण्यासाठी आटापिटा करत असताना भाजपने आपल्या बँक खात्यात बक्कळ पैसा जमा केला आहे आणि पक्षाच्या कारभारासाठी प्रचंड मोठी इमारत उभारली आहे. कदंबा पठार हा सध्या सर्वांत महागडा परिसर आहे. तिथे सध्याच्या स्थितीत चाळीस ते पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त दराने जमीन विकली जात आहे. अशा ठिकाणी भाजपने राज्यातील आपले मुख्यालय उभारले आहे. भाजपचे राष्ट्रीय स्तरावरही हेच धोरण आहे. पक्षाच्या कामासाठी चांगली जागा असायला हवी. त्याचा प्रभाव लोकांवर पडतो, हे तसे चूक म्हणता येणार नाही. तेच धोरण ते देशभर राबवत आहेत. देशभर भाजपची साडेसहाशेच्या आसपास कार्यालये आहेत, जी पक्षाची स्वतःची मालमत्ता आहे. दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, गुजरात, तेलंगणा, आसाम, हिमाचल प्रदेश अशा अनेक राज्यांत भाजपने इमारती उभ्या केल्या आहेत.
देशात ज्या पक्षाला वर्षाकाठी हजारो कोटी रुपयांची प्राप्ती होते, त्यात भाजपच सर्वांत आघाडीवर आहे. केंद्रामध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये सत्ता असल्यामुळे भाजपचा प्रभाव एवढा आहे की लोक त्यांनाच कोट्यवधी रुपये देत आहेत. २०२४-२५ साली भाजपने ६७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्राप्ती जाहीर केली आहे. १२ हजार कोटींपेक्षा जास्त ज्यांची मालमत्ता आहे, त्या पक्षाशी इतर पक्षांची तुलनाही होऊ शकत नाही. त्यामुळे गोव्यात काही वेगळी स्थिती नाही. गोव्यातही भाजप सत्तेत असल्यामुळे मोठ्या देणग्यांचे प्राधान्य हे भाजपलाच असेल, यात काही शंका नाही. सत्य स्थिती तीच आहे. त्यामुळे भाजपने एवढे मोठे कार्यालय उभे केले, यात नवल वाटण्यासारखे नाही. फक्त काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षाने इतकी वर्षे गोव्यात सत्ता करूनही त्यांच्याकडे असे भव्य-दिव्य संकुल सोडाच, पण कार्यालयही नाही यावरून त्यांच्या नेत्यांनी फक्त आपले बंगले उभारण्यातच धन्यता मानली आणि पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यालय या गोष्टींना प्राधान्य दिले नाही हेही खरे आहे. भाजपने पक्षाला जास्त महत्त्व दिल्यामुळेच त्यांच्याकडे एवढे मोठे भवन आज आहे. पक्ष बांधण्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी हक्काचे कार्यालय असावे, हे भाजपने हेरले. हे कार्यालयही त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. अनेक राजकीय पक्षांना फक्त निवडणुकांवेळी कार्यकर्ते आठवतात. अनेक नेत्यांना फक्त निवडणूक लढायच्या वेळीच उमेदवारी मिळावी यासाठी राजकीय पक्ष आठवतात. भाजप त्याला याचसाठी अपवाद आहे की त्यांच्याकडे तयार केलेला केडरचा कार्यकर्ता आहे. त्याच कार्यकर्त्यांच्या बळावर आज त्यांच्याकडे सत्ता आहे आणि सलगपणे सत्ता मिळाली की पक्षासाठी मोठे भवन उभारणे कठीण नाही.


