अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र होत असताना वॉशिंग्टनने इराकला सुमारे ८०० दशलक्ष डॉलरचे हेलिकॉप्टर आणि लष्करी उपकरणे विकण्यास मंजुरी दिली आहे. ही केवळ लष्करी खरेदी नाही, तर मध्य पूर्वेतील बदलत्या समीकरणात अमेरिकेची एक महत्त्वाची रणनीतिक चाल म्हणून पाहावी लागेल. प्रस्तावित व्यवहारात 'बेल ४१२ ईपीएक्स' आणि 'बेल ४०७ एम हेलिकॉप्टर', शस्त्रास्त्रे, सेन्सर्स, क्षेपणास्त्र इशारा प्रणाली, रॉकेट लाँचर, मशीनगन, संचार उपकरणे, सुटे भाग आणि प्रशिक्षणाचा समावेश आहे.
प्रश्न असा आहे की, अमेरिकेला इराकला एवढी मोठी लष्करी क्षमता देण्याची गरज का भासली? याचे उत्तर इराकच्या भौगोलिक आणि राजकीय स्थितीत दडलेले आहे. इराक हा एकीकडे अमेरिकेसोबत संरक्षण सहकार्य टिकवून ठेवू इच्छितो, तर दुसरीकडे देशात इराणशी जवळीक असलेल्या सशस्त्र गटांचा प्रभाव अद्याप मोठा आहे. त्यामुळे बगदादला स्वतःच्या सुरक्षा यंत्रणेवर अधिक नियंत्रण मिळवून देणे, हा अमेरिकेच्या रणनीतीचा भाग असू शकतो.
अमेरिकेसाठी इराकचे महत्त्व केवळ दहशतवादविरोधी कारवायांपुरते मर्यादित राहिलेले नाही. इराकच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग तेलावर अवलंबून आहे आणि इराणशी त्याचे व्यापारी संबंधही खोल आहेत. २०२५ मध्ये दोन्ही देशांतील व्यापार १० अब्ज डॉलरपेक्षा अधिक होता. त्यामुळे इराणवर आर्थिक दबाव वाढवताना इराकला आपल्या प्रभावक्षेत्रात ठेवणे वॉशिंग्टनसाठी तितकेच महत्त्वाचे ठरते. हेलिकॉप्टर पॅकेजचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यातील निगराणी आणि लक्ष्यभेदनाची क्षमता. म्हणजेच इराकी सैन्याला केवळ वाहतूक किंवा गस्तीसाठी साधने मिळणार नाहीत, तर जमिनीवरील धोक्यांची ओळख आणि त्याविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची क्षमता वाढेल. विशेषतः इराकमधील सशस्त्र गटांविरुद्ध सरकारला स्वतःच्या बळावर कारवाई करावी लागली तर ही साधने उपयुक्त ठरू शकतात.
मात्र, याच ठिकाणी अमेरिकेसमोर गुंतागुंतीचे आव्हान आहे. इराकला शस्त्रे देणे म्हणजे बगदादला मजबूत करणे; पण त्या क्षमतेचा वापर कोणाविरुद्ध आणि कोणत्या राजकीय नियंत्रणाखाली होईल, हा प्रश्न उरतो. इराकमधील इराणसमर्थक गट आणि केंद्रीय सरकार यांच्यातील समीकरण सतत बदलत असते. अशा परिस्थितीत अमेरिकन शस्त्रास्त्रे देशातील अंतर्गत संघर्षाचा भाग बनू नयेत, याची काळजी बगदादला घ्यावी लागेल.
ही वेळ विशेष महत्त्वाची आहे, कारण अमेरिकेने अलीकडेच इराणशी संबंधित इराकी बँका आणि नेटवर्कवरही दबाव वाढवला आहे. वॉशिंग्टन इराणच्या आर्थिक आणि लष्करी प्रभावाला रोखण्याचा प्रयत्न करत असताना त्याच वेळी इराकच्या सुरक्षा क्षमतेत गुंतवणूक करत आहे. त्यामुळे ही शस्त्रविक्री व्यापक ‘कंटेनमेंट’ रणनीतीचा एक भाग असल्याचे दिसते.
- सचिन दळवी


