क्रिया योग : एक शक्तिशाली, आव्हानात्मक मार्ग

जर तुमचा कल फक्त या तुरुंगातून कसाबसा सुटून जाण्याचा आहे, तुम्हाला फक्त आत्मसाक्षात्कार किंवा मुक्ती हवी आहे, तर मग तुम्हाला खरोखर क्रिया योगाचा मार्ग चालावा लागणार नाही.

Story: विचारचक्र |
31st August, 12:28 am
क्रिया योग : एक शक्तिशाली, आव्हानात्मक मार्ग

सद्गुरू : मुळात, क्रिया म्हणजे आंतरिक कृती. जेव्हा तुम्ही आंतरिक कृती करता, त्यात शरीर आणि मन यांचा समावेश होत नाही कारण अजूनही शरीर आणि मन दोन्हीही तुमच्यासाठी बाह्य गोष्टी आहेत. जेव्हा तुमच्याकडे ऊर्जेचा वापर करून कृती करण्याचे ठराविक प्रभुत्व असते, तेव्हा ती क्रिया असते. तुम्ही जर बाह्य कृती केली तर आम्ही त्याला कर्म म्हणतो; जर तुम्ही आंतरिक कृती केली तर आम्ही त्याला क्रिया म्हणतो. परंपरेने, किंवा साधारणपणे असे समजले जाते की : कर्म ते आहेत जे तुम्हाला बांधतात, क्रिया त्या आहेत ज्या तुम्हाला मुक्त करतात.

तुमच्या शरीराने, प्रवृत्तीने आणि विचाराने आपण जे काही करतो, उदाहरणार्थ आज तुमचे विचार कदाचित एका दिशेने जाऊ शकतात. उद्या जर दुसऱ्या व्यक्तीने येऊन तुमच्यावर प्रभाव टाकला, तर ते दुसऱ्या दिशेने जातील. त्याचप्रमाणे, आम्ही तुमच्या शरीरासोबत जे काही करतो, तुमचे शरीर आज ठीक आहे म्हणून त्याला आसने आवडतात. उद्या सकाळी जर तुमचे शरीर ताठर असेल, तर तुम्ही आसनांचा तिरस्कार कराल. तुमच्या भावना अजिबात भरवशाच्या नाहीत. कोणत्याही क्षणी त्या इकडून तिकडे बदलू शकतात. पण तुमच्या ऊर्जा वेगळ्या आहेत. एकदा का आपण ऊर्जेवर एका विशिष्ट पद्धतीने काम करायला सुरुवात केली, तर त्यात जीवनाची एक वेगळीच गहनता असते. अचानक, तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला एक वेगळाच आयाम येतो, कारण तुमच्या ऊर्जा पूर्णपणे वेगळ्याप्रकारे स्पर्श करून सक्रिय केल्या गेल्या आहेत.

क्रिया योग ही आध्यात्मिक मार्गावर चालण्याची अतिशय शक्तिशाली पद्धत आहे, पण त्याचवेळी हा खूप आव्हानात्मक मार्ग आहे. एखाद्या व्यक्तीकडून ते काही अपेक्षित आहे, ते प्रचंड आहे. यासाठी शिस्त आणि प्रत्येक गोष्टीत एक ठराविक अचूकता हवी असते. बहुतेक लोकांकडे आता क्रिया योग मार्गासाठी शरीर, मन किंवा भावना यांची स्थिरता नाही, कारण लहानपणापासूनच लोक खूप आरामात आहेत. आरामाचा अर्थ शारीरिक आराम होत नाही. आरामदायक खुर्चीत बसणे हा अडथळा नाही. पण तुमचे संपूर्ण अस्तित्व नेहमी आराम शोधत असते, तो मोठा अडथळा आहे. जर तुम्ही एखाद्या आरामदायक गोष्टीवर बसला आहात, तर त्याचा आनंद घ्या - त्यात काही समस्या नाही. पण जर तुम्ही सतत आराम शोधत असाल, तर अशा प्रकारचे मन आणि भावना क्रिया योगाच्या मार्गासाठी अपात्र आहेत.

जर मी कोणाला क्रियेच्या मार्गावर घेतले, जर मी तुम्हाला सांगितले की पाय वर आणि डोके खाली करून झोपा, तर तुम्ही प्रश्न न विचारता तसेच झोपायला हवे, कारण हे सर्व कधीच समजावून सांगता येत नाही. तुम्ही पुढे जाताना कदाचित जाणवेल, पण ते कधीच समजावून सांगता येत नाही. जर मी तुम्हाला सांगितले, "फक्त बाहेर जा, मुंग्यांचे घर फोडा आणि पुढचे सात दिवस मुंग्यांच्या घरातली माती खा," प्रश्न न विचारता तुम्ही ती आनंदाने खायला हवी. नाहीतर क्रिया योग कठीण ठरेल. जर लोकांनी प्रत्येक गोष्टीसाठी मूर्खपणाचे तार्किक प्रश्न विचारायला सुरुवात केली, तर तुम्हाला क्रिया दिल्या जाऊ शकत नाहीत.

मला जर तुम्हाला फक्त सराव म्हणून क्रिया शिकवायच्या असतील, तर मी त्याबद्दल एक पुस्तक लिहू शकतो, आणि तुम्ही ते वाचून शिकू शकता. पण जर तुम्हाला क्रिया ही एक जिवंत प्रक्रिया म्हणून हवी असेल, जर आम्हाला क्रिया ही तुमच्या प्रणालीत एका विशिष्ट पद्धतीने छापायची असेल, तर त्यासाठी एक ठराविक शिस्त आणि समर्पण हवे असते. तुमच्या ऊर्जा दुसऱ्या व्यक्तीसमोर उघडण्यासाठी एक ठराविक प्रमाणात विश्वास हवा असतो जेणेकरून तुम्ही संपूर्णपणे असुरक्षित होता. तो तुमच्यासोबत काहीही करू शकतो, आणि सुरुवातीला तुम्ही आश्चर्य कराल की तो तुमच्यासोबत काय करत आहे, कारण क्रियांच्या सुरुवातीच्या टप्प्यात असे घडू शकते की तुम्हाला कळणार नाही की, तुम्हाला आत्मसाक्षात्कार होत आहे की, तुम्ही वेडे होत आहात. त्या कालावधीत टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा विश्वास असायला हवा. नाहीतर क्रिया कठीण होईल. म्हणून साधारणपणे क्रियेच्या मार्गावर, बहुतेक गुरु शिष्यांना वाट बघायला लावतात. तुम्ही येता आणि तुम्हाला क्रिया योग शिकायचा असतो. "ठीक आहे, फरशी झाडा." "अरे, वर्षभर फरशी झाडण्याचे काम झाले? भांडी घासा." फक्त त्याला बराच काळ वाट पाहायला लावा. त्याचा वापर करा, गैरवापर करा, त्याचा गैरफायदा घ्या, आणि तरीही त्याचा विश्वास हलत नाही, "अरे, याचे काहीतरी कारण असेल." जेव्हा असा बनतो, तेव्हा त्याला क्रियांमध्ये दीक्षा दिली जाऊ शकते. नाहीतर, एकदा का तुम्ही त्याला एका विशिष्ट पद्धतीने सशक्त केले की मग त्याची प्रणाली सामान्य प्रमाणापेक्षा जास्त उत्साही होते, जर त्याची प्रवृत्ती आणि भावना योग्य नसतील, तर तो स्वतःचे प्रचंड नुकसान करेल.

क्रिया योग फक्त तेव्हाच महत्वाचा आहे जेव्हा तुम्हाला साक्षात्काराच्या पलीकडे गोष्टी करायच्या आहेत. जर तुमचा कल फक्त या तुरुंगातून कसाबसा सुटून जाण्याचा आहे, तुम्हाला फक्त आत्मसाक्षात्कार किंवा मुक्ती हवी आहे, तर मग तुम्हाला खरोखर क्रिया योगाचा मार्ग चालावा लागणार नाही. क्रियांचा वापर थोड्या प्रमाणात केला जाऊ शकतो, ते खूप तीव्र असण्याची गरज नाही. जर तुम्ही क्रियेचा मार्ग खूप तीव्रतेने अनुसरला, तर मार्गदर्शनाशिवाय त्याला परिपक्व होण्यासाठी काही जन्म लागू शकतात. जर अशी एखादी जिवंत व्यक्ती आहे जी तुमच्यासोबत गोष्टी करू शकते, तर ते या जन्मातच घडू शकते. नाहीतर क्रिया हा थोडासा फिरून जाणारा मार्ग आहे. पण इथे तुम्ही केवळ साक्षात्कार शोधत नाही आहात, तुम्हाला जीवन निर्मितीची यंत्रणा देखील जाणून घ्यायची आहे. जीवन कशा प्रकारे निर्माण होते - त्याबद्दल काय करायचे, याची अभियांत्रिकी तुम्हाला जाणून घ्यायची आहे. म्हणूनच ही खूप लांबलचक प्रक्रिया आहे.



(ईशा फाऊंडेशन)