भारताची ब्लूबर्ड ब्लॉक २ मोहीम: एलव्हीएम३ एम६ उपग्रहाचे केले यशस्वी प्रक्षेपण

मोहीम यशस्वी : इस्रो अध्यक्ष व्ही. नारायणन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
भारताची ब्लूबर्ड ब्लॉक २ मोहीम: एलव्हीएम३ एम६ उपग्रहाचे केले यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली :  भारताच्या (India)  अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) (ISRO) बुधवारी सकाळी आपल्या सर्वात बाहुबली ब्लूबर्ड ब्लॉक २ मोहीमेअंतर्गत एलव्हीएम३ : एम६ (LVM3-M6)  उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करीत इतिहास रचला. 

सकाळी ८.५५ वाजता एलव्हीएम३ ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून उड्डाण केले आणि १५ मिनिटांनंतर उपग्रहाला नियोजित कक्षेत स्थापित केले. 

या मोहिमेद्वारे इस्रोने दोन महत्त्वाचे टप्पे गाठले ते म्हणजे निम्न पृथ्वी कक्षेत सर्वात मोठा व्यावसायकि दळणवळण उपग्रह तैनात केला. आणि ब्लूबर्ड ब्लॉक २ उपग्रह हा भारतीय भूमीवरून एलव्हीएम३ द्वारे प्रक्षेपित केलेला सर्वात जड पेलोड (६,१०० किलो)  ठरला. 

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन (ISRO chairman V. Narayanan) यांनी ही मोहीम यशस्वी झाल्याचे घोषित केले. ब्लूबर्ड ब्लॉक २ दळणवळण उपग्रह अमेरिकेच्या एएसटी स्पेसमोबाईलने विकसित केला आहे.  ब्लूबर्ड ब्लॉक २ दळणवळण उपग्रहांचा एक भाग आहे. जो थेट सामान्य मोबाईल स्मार्टफोनला अंतराळ आधारित सेल्युलर ब्रॉडबॅंड कनेक्ट‌िव्ह‌िटि प्रदान करण्यासाठी डिझाइन केला आहे. 

‘ब्लूबर्ड ब्लॉक २ मोहीम ही उपग्रहाद्वारे थेट मोबाईल कनेक्ट‌िव्ह‌िटी प्रदान करण्यासाठी जागतिक निम्न पृथ्वी कक्षा (एलईवो) तारामंडळाचा एक भाग आहे. हे तारामंडळ ४जी आणि ५जी व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल, संदेश, स्ट्रीमिंग आणि डेटा सक्षम करणार. यात २२३ चौरस मीटरचा फेझ्ड अॅरे आहे. ज्यामुळे तो निम्न पृथ्वी कक्षेत तैनात केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यावसायिक दळणवळण उपग्रह ठरल्याचे इस्रोने म्हटले आहे.  

हा उपग्रह थेट अंतराळातून सामान्य स्मार्टफोनवर ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवा पुरवण्यास मदत करणार आहे. यासाठी ग्राहकांना कोणत्याही विशेष उपकरणांची गरज भासणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

हेही वाचा