
नवी दिल्ली (New Delhi ) : आसाम (Assam) येथील नागाव जिल्ह्यात शनिवारी सकाळी राजधानी एक्सप्रेसच्या (Rajdhani Express) धडकेत सात हत्ती ठार झाले. पाच डबे रुळावरून घसरले.
डिसेंबर रोजी जमुनामुख कामपुर विभागातील लुमडींग प्रभागात उत्तरपूर्व फ्रंटीयर रेल्वेच्या अखत्यारीत हा अपघात घडला. रेल्वे क्रमांक २०५०७ डीएन साईरंग नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसला हा अपघात घडला. हत्तींचा एक कळप रेल्वे रुळावरून जात होता. रेल्वे गाडीच्या धडकेत त्यातील सात हत्ती ठार झाले. गुवाहटी येथून १२६ किमी अंतरावर हा अपघात घडला. अपघात घडलेले क्षेत्र हे हत्ती ‘कॉरीडर’ म्हणून निश्चित केले नव्हते; अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
अपघाताचे गांभीर्य पाहता कर्मचारी किंवा प्रवासी जखमी झाले नसल्याचे माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. लोको पायलटने रेल्वे रुळावरून जात असलेले हत्ती पाहिल्यानंतर आपत्कालीन ‘ब्रेक’ लावला. तरीही धडक बसली. अपघातानंतर लुमडींग विभागीय मुख्यालयातील अधिकारी मदत पथकाचा समावेश असलेली रेल्वेगाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेगाडीतील घसरलेल्या प्रवाशांना इतर डब्यात बसवण्यात आले. घसरलेले डबे वेगळे केल्यानंतर रेल्वेगाडी सकाळी ६.११ वाजता गुवाहटीला सोडण्यात आली. रेल्वे अधिकारिणीने हेल्पलाईनही सुरू केली आहे.