पाळी मतदारसंघात सर्वात जास्त तर सासष्टीतील नावेलीत सर्वात कमी मतदानाची नोंद

पणजी : गोव्यात (Goa) जिल्हा पंचायत निवडणुकीच्या (Zilla Panchayat Election) मतदानासाठी समीश्र प्रतिसाद मिळत आहे. दुपारी १२ पर्यंत पाळी मतदारसंघात सर्वात जास्त ४७.८६ टक्के मतदान झाले. सासष्टीतील नावेलीत सर्वात कमी २५.२९ टक्के मतदान झाले. अंध व्यक्तींना सहाय्यक नसल्याची तक्रार सातोर्ली, गावडोंगरी येथील सत्यवान गावकर यांनी केली.
सकाळी १० वाजेपर्यंत एकूण १५.११ टक्के मतदान झाले होते. त्यात पाळी (Pale) मतदारसंघात सर्वात जास्त २०.६६ टक्के तर ताळगाव (Taleigao) मतदारसंघात ११.१५ टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी कमी प्रतिसाद मिळाला. राजकीयदृष्ट्या संवेदनशील सासष्टी तालुक्यातील मतदारसंघांत दुपारी १२ पर्यंत कमी मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पहिल्याच वेळी मतदानाचा हक्क बजावून आलेल्या नवमतदारांमध्ये उत्साह दिसत होता. वयस्कांनीही मतदानाचा हक्क बजावला.
अंध व्यक्तींना सहाय्यक नाही : सत्यवान गावकर
जिल्हा पंचायतीच्या मतदानासाठी अंध व्यक्तींना सहाय्यक न दिल्याची तक्रार सातोर्ली, गावडोंगरी येथील सत्यवान गावकर यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मतदान केंद्रावरील संबंधितांना विचारले असता, या निवडणुकीला तशी सोय करण्यात आली नसल्याचे सांगितले. त्यावर प्रत्येक निवडणुकीत तशी सोय करणे गरजेचे असून, अन्यथा अंध व्यक्तींचे मतदान करणारी व्यक्ती आपल्या मर्जीनुसार मतदान करण्याची शक्यता असल्याची कैफीयत सत्यवान गावकर यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना केली.
झेंडे, टोप्या पोलिसांनी केले जप्त
सेंट लॉरेन्स मतदारसंघात आप पक्षाचे कार्यकर्ते मतदान केंद्राजवळ पक्षाचे झेंडे व टोप्या घालून बसले होते. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी ते साहित्य जप्त केले.