मुख्यमंत्री ज्ञानपर्व योजनेखाली होणार नेमणूक

पणजी : गोव्यात (Goa) राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (NEP) प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरावर कंत्राटी पद्धतीने १००८ शिक्षक आणि ३७७ इन्स्ट्रक्टर मिळून १३८५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या नेमणूका सर्व शिक्षा अभियानाखाली होणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी कारवाईसाठी शिक्षण खात्याने (Education Department) मुख्यमंत्री ज्ञानपर्व योजना अधिसूचीत केली आहे. सरकारी (Government) तसेच अनुदानित संस्थांसाठी योजना लागू होणार आहे.
राज्यात टप्प्या टप्प्याने राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. फाऊंडेशन, प्रीपेरेटरी, मीडल आणि सेंकडरी असे चार टप्पे (बारावी पर्यंत) आहेत. विषय तसेच तास वाढल्याने आणखी शिक्षकांची आवश्यकता आहे. संगीत, चित्रकला अशा एनएसक्यूएफ विषयांसाठी शिक्षक तसेच इन्स्ट्रक्टरांची आवश्यकता आहे. शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी मुख्यमंत्री ज्ञानपर्व योजनेखाली कंत्राटी पद्धतीवर शिक्षक तसेच इन्स्ट्रकरांची भरती करण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता, पगार, भरतीची पद्धत या योजनेखाली निश्चित केली आहे.
फाऊंडेशन आणि प्रीपेरेटरी (फाऊंडेशन ते पाचवी पर्यंत) टप्प्यासाठी ६००, माध्यमीक स्तरासाठी (सहावी ते आठवी पर्यंत) ५८ आणि उच्च माध्यमिक (नववी ते बारावी पर्यंत) ३५० मिळून १००८ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कला विषयांसाठी ३०० तर एनएसक्यूएफ विषयांसाठी ७७ मिळून ३७७ इनस्ट्रक्टरांची नेमणूक होणार आहे. ही नेमणूक कंत्राटी पद्धतीवर असणार आहे.
कुठल्याही स्थितीत शिक्षकांना सेवेत कायम केले जाणार नाही. शिक्षक, इन्स्ट्रक्टर कायमस्वरूपी नोकरीसाठी दावा करणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र त्यांना सादर करावे लागणार आहे. नेमणूक ५ वर्षांसाठी असणार. शिक्षक तसेच इनस्ट्रक्टरांना सुरवातीला २० हजार रुपये पगार असणार. वर्षागणीक पगारात ३ टक्के वाढ होणार. सलग पाच वर्षांच्या सेवेनंतर ५ हजार रुपये पगार वाढणार. पुढील ५ वर्षांच्या सेवेनंतर पगार आणखी ५ हजार रुपये वाढणार. शिक्षक, इन्स्ट्रक्टरांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार. कामगिरीप्रमाणे पगार वाढणार.