
पणजी : कोकण रेल्वे महामंडळाने (Konkan Railway Corporation( ७३९ किमी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातील गोव्यातील (Goa) मडगाव (Margao) ते माजोर्डा (Majorda) रेल्वे स्थानकापर्यंतचे (Railway Station) दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. गोवा सरकारचे गुंतवणुकीसाठीचे योगदान घेऊन राहिलेले दुपदरीकरणाचे काम पूर्ण करणार, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली.
लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ सरकार या पाच भागधारकांना घेऊन कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेडची स्थापना वर्ष १९९० साली करण्यात आली होती. कोकण रेल्वेत सर्वात मोठा ६६.३५ टक्के वाटा रेल्वे मंत्रालयाचा आहे. १५.११ टक्के वाटा महाराष्ट्र सरकारचा, कर्नाटक सरकारचा १०.३० टक्के तर गोवा व केरळ सरकारचा प्रत्येकी १४.१२ टक्के वाटा आहे.
सध्या, कोकण रेल्वेच्या मंगळूर मुंबई क्षेत्रात २८ जोड्या रेल्वे धावतात तर मंगळूर मडगाव क्षेत्रात ३३ जोड्या रेल्वे धावतात. तसेच गोव्यासाठी ४ वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या सेवेचा समावेश केलेला आहे. या रेल्वे गाड्या मंगळूर मडगाव व मडगाव मुंबई मार्गावर धावतात. कोकण रेल्वेच्या कार्यकक्षेत येणारे ७३९ किमी रेल्वे दुपदरीकरण करण्याचे काम हातात घेतले आहे. त्यातील रोहा वीर आणि मडगाव माजोर्डा विभागातल्या ५५ किमी रेल्वे दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. राहिलेले ६८५ किमी मार्गाचे दुपदरीकरण करणे बाकी आहे. यासाठी भागधारक राज्यांच्या योगदानासहीत भरीव गुंतवणुकीची गरज आहे. राज्यांच्या भागधारक वाट्या नुसार राज्यांनी भांडवल गुंतवणुकीसाठी आपले योगदान द्यावे, हे सांगण्यासाठी रेल्वे मंत्रालय राज्य सरकारला येवून भेटले आहे.