
मडगाव : गोव्यातील (Goa) फातर्पा येथील श्री शांतादुर्गा भुमिपुरुष सप्तकोटेश्वर संस्थानच्या श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानचा (Shri Shantadurga Fatarpekarin Devsthan) वार्षिक जत्रोत्सव 21 ते 24 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष देवेंद्र देसाई यांनी दिली.

फातर्पा (Fatorpa) येथे श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानात आयोजित पत्रकार परिषदे वेळी देवेंद्र देसाई यांनी वार्षिक जत्रोत्सवाविषयी माहिती दिली. यावेळी सरचिटणीस अजय देसाई, खजिनदार सत्येंद्र देसाई व मुखत्यार संजय देसाई उपस्थित होते. अध्यक्ष देसाई यांनी सांगितले की, शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानात होणार्या कार्यक्रमांची संख्या वाढलेली आहे. राज्यासह परराज्यांतून येणार्या भाविकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. संस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव 21 डिसेंबरपासून होणार आहे. या चार दिवसीय उत्सवात विविध धार्मिक विधी, रथोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जत्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी 21 डिसेंबर रोजी सकाळी महाअभिषेकाने उत्सवाची सुरूवात होईल. रात्री नमन, 10 वाजता शिबिकोत्सव व त्यानंतर दिंडीच्या गजरात चांदीच्या रथातून श्रींची मिरवणूक होईल. तसेच रात्री ‘पांडगो इलो रे बा इलो’ हे दोन अंकी मालवणी नाटक सादर होणार आहे.
22 डिसेंबर रोजी श्रींचा महाभिषेक, रात्री शिबिकोत्सव व त्यानंतर दिंडीच्या गजरात मयुर रथातून श्रींची मिरवणूक होईल. त्यानंतर ‘आरे देवा तूं रे भावा?’ हे कोकणी नाटक सादर होईल. 23 रोजी सकाळी श्रींचा महाभिषेक, रात्री शिबिकोत्सव व त्यानंतर दिंडीच्या गजरात श्रींची सूर्य रथातून मिरवणूक काढण्यात येईल. यानंतर दोन अंकी कोकणी नाटक ‘यो... घर तुमचेच’ हा नाट्यप्रयोग सादर होईल.
बुधवारी 24 रोजी सकाळी श्रींचा महाभिषेक, सायंकाळी स्थानिक मुलांचे कार्यक्रम, 11 वाजता युनायटेड आर्ट निर्मित स्टार मेलेाडिज हा ऑक्रेस्ट्रा सादर होईल. 25 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता दिंडीच्या गजरात श्रींची महारथातून मिरवणूक काढण्यात येईल, असे सांगण्यात आले. या जत्रोत्सवानिमित्त मंदिर व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत. याशिवाय पोलीस, अग्निशामक दल व प्रशासनाचेही सहकार्य घेण्यात येणार असल्याचे देसाई म्हणाले.
उत्सवाच्या दरम्यान दररोज दुपारी व रात्री महाप्रसाद असेल. श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू आणि कपड्यांचा जाहीर लिलाव 26, 27 व 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत संस्थानच्या परिसरात होणार आहे. श्रींच्या सर्व भक्तगणांनी या उत्सवास उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने अध्यक्ष व समितीने केले आहे.
