जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदार भाजपला जागा दाखवतील : काँग्रेस

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
37 mins ago
जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदार भाजपला जागा दाखवतील :  काँग्रेस

पणजी : मागील काही वर्षांत भाजप सरकारने गोव्याची (Goa) नासाडी केली आहे. यामुळे जनता नाराज झाली आहे. येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीत (zilla Panchayat Election)  मतदार मतांमधून आपला राग व्यक्त करून भाजपला (BJP) जागा दाखवून देतील असे प्रतिपादन काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर (Amit Patkar) यांनी केले. बुधवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर उपस्थित होते.

पाटकर म्हणाले की, सध्या आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत. यावेळी जनता भाजपच्या कामांवर खूश नसल्याचे समजून येत आहे. ही गोष्ट भाजप नेत्यांना देखील समजली आहे. त्यांच्या पायाखालची जमीन हलली आहे. त्यामुळेच कदाचित प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री जिल्हा पंचायतीसाठी घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. काही ठिकाणी मतदारांना प्रलोभन देण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी या निवडणुकीत काँग्रेसलाच यश मिळणार आहे.

ते म्हणाले, निवडणुकीत काँग्रेस पक्ष ३६ तर गोवा फॉरवर्ड ९ जागांवर लढत आहे. आम्ही ५ अपक्षांना पाठिंबा देणार आहोत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये आमच्या युतीला यश मिळेल अशी आमची खात्री आहे. केंद्राने राज्यातील पंचायतींना ३६८ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. मात्र, राज्य सरकारने निधी वापर प्रमाणपत्र व अन्य कागदपत्र न दिल्याने यातील १५२ कोटी निधी गोठवून ठेवण्यात आला आहे. यावरूनच राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत गंभीर नाही हे समजून येते.

आप मते फोडत आहे

पाटकर म्हणाले की, आम आदमी पक्ष आणि आरजीपी आपण भाजपाविरोधात असल्याचे सांगतात. मात्र, मागील काही दिवस ते केवळ काँग्रेस पक्षावरच टीका करत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी देखील काँग्रेसलाच लक्ष्य केले. आप भाजप विरोधातील मते फोडण्याचे काम करत आहे. सध्या, केवळ काँग्रेसच भाजप विरोधात लढत आहे.

पक्षाच्या अध्यक्षांनी जपून बोलावे 

जिल्हा पंचायत निवडणुकीत काही जागांबाबत आरजीपी नेते नाराज होते. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पक्षाच्या अध्यक्षांनी जबाबदारीने वक्तव्य करणे आवश्यक. भाजप सर्व क्षेत्रात अपयशी ठरले आहे. याचा राग जनता मतदानातून दाखवून देईल असे माणिकराव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा