ऑस्ट्रेलियात गोळीबार करणारा साजिद अक्रम भारतातील हैदराबादचा

दोन पैकी एका हल्लेखोराने बनावट भारतीय पासपोर्टद्वारे केला फिलिपिन्स प्रवास

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
32 mins ago
ऑस्ट्रेलियात गोळीबार करणारा साजिद अक्रम भारतातील हैदराबादचा

हैदराबाद : सिडनी, ऑस्ट्रेलिया (Sydeny, Australia) येथील बोंडी बीचवर गोळीबार करून कित्येकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला हल्लेखोर साजिद अक्रम (Sajid Akram)  हा मूळ भारतीय (Indian)  असून, हैदराबाद येथील असल्याची माहिती उघड झाली आहे. हल्ला केलेल्या दोघांपैकी एकाने बनावट भारतीय पासपोर्टवर (Indian Passport)  फिलिपिन्स (Philippines) येथे प्रवास केला व इस्लामिक कट्टरपंथीयांची भेट घेतल्यानंतर लष्करी प्रशिक्षण घेतल्याचे पुढे आले आहे. तपास यंत्रणा यासंदर्भात तपास करीत आहेत. या दोघांवरही इस्लामिक स्टेटचा (आयएस) प्रभाव होता, असेही तपासात पुढे आले आहे. 

सिडनीच्या बोंडी बीचवर १४ डिसेंबर रोजी साजिद अक्रम व नवीद अक्रम या पिता व पुत्राने ज्यू समुदायावर बेधूंद गोळ्या झाडल्या होत्या. त्यात १२ ज्यू व ३ इतर मिळून १५ लोक ठार झाले होते. हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर हे दोघेही पिता पुत्र चर्चेत आले होते. हल्ल्यानंतर स्थानिक पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर साजिद अक्रम (५० वर्षे) ठार झाला तर त्याचा मुलगा नवीद अक्रम जखमी झाला. या घटनेनंतर दोघांचा सखोल तपास सुरू झाला. त्यात वरील माहिती पुढे आली. 

हैदराबादचे पोलीस महासंचालक (डीजीपी) बी. शिवधर रेड्डी यांनी वरील माहितीला दुजोरा दिला आहे. हैदराबाद येथे साजिद अक्रम (५० वर्षे) याने वाणिज्य शाखेत शिक्षण घेतले. शिक्षण घेतल्यानंतर १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियात जाऊन युरोपियन वंशाच्या महिलेबरोबर विवाह केला. 

ऑस्ट्रेलियात गेल्यावर साज‌िद अक्रमचा गेल्या २७ वर्षांत हैदराबाद येथील कुटुंबाशी जास्त संपर्क नव्हता. त्यानंतर सहा वेळा भारतात आला होता. साजिद अक्रम कट्टरपंथी बनण्यास भारताशी काहीही संबंध नसल्याचे डीजीपी बी. शिवधर रेड्डी यांनी स्पष्ट केले. 

साजिद अक्रमने ऑस्ट्रेलियात जाऊन मुस्लीम महिलेशी लग्न केले होते. त्यानंतर हैदराबाद येथील कुटुंबाने त्याच्याशी संबंध तोडले होते. हैदराबाद येथील जुन्या शहरात साजिदचे कुटुंब राहत होते. त्याचे दोन भाऊ अजून त्याठिकाणी राहतात. २००९ मध्ये साजिदच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी साजिद हैदराबाद येथे आला नव्हता, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.  

एका हल्लेखोराचा भारतीय पासपोर्टवर फिलिपिन्स प्रवास

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील सिडनी बीचवर ज्यूं लोकांवर गोळीबार केलेल्या दोनपैकी एकाने म्हणजेच साजिद अक्रमने बनावट भारतीय पासपोर्टवर फिलिपिन्स प्रवास केल्याचे पुढे आले आहे. तेथे जाऊन त्याने प्रशिक्षण घेतले. फिलिपिन्सला जाऊन इस्लामिक कट्टरपंथी प्रचारकांना भेटले. त्यानंतर लष्करी जवानांना दिले जाते तसे प्रशिक्षण घेऊन परतल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हल्लाप्रकरणाचा तपास करणारी संस्था यासंदर्भात तपास करीत आहे. 


हेही वाचा