
नवी दिल्ली (New Delhi) : विदेशातील आठवड्याला चार दिवस काम व तीन दिवस सुट्टी, या धोरणाचा चांगला प्रभाव दिसून आल्याने भारतातही (India) त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) कामगार आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labour and Employment ) तसे संकेत दिले आहेत.
विदेशात जपान, स्पेन, जर्मनीसारख्या देशांमध्ये ‘४ डे कार्य संस्कृती’ यशस्वीपणे अंमलात आणली जात आहे. याचा सकारात्मक प्रभावही दिसून आला असून, या बदलामुळे कार्यालयीन खर्चात बरीच कपात झाली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे आरोग्य व उत्पादकता वाढल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर, भारतातही ‘चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी’ हे धोरण लागू करण्यासंदर्भात चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आहे.
मंत्रालयाकडून महत्त्वाची घोषणा
भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडल ट्वीटरवर १२ डिसेंबरला एक महत्त्वाची पोस्ट केली आहे. मंत्रालयाने या पोस्टमधून नवीन कामगार संहितेअंतर्गत ४ दिवसांचा कामाचा आठवडा स्वीकारण्यास ‘सैद्धांतिक’ संमती दर्शवली आहे. एका आठवड्यातील कामाची कमाल मर्यादा ४८ तास इतकी कामगार संहितेनुसार निश्चित करण्यात आली आहे. पूर्वीपासूनच हा नियम आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, ४८ तासांच्या मर्यादेत राहून ४ दिवसांचा कामाचा आठवडा शक्य आहे.
दैनंदिन शिफ्ट १२ तासांची
कामाचा आठवडा चार दिवसांचा करण्यासाठी एक प्रमुख अट निश्चित करण्यात आली आहे. आस्थापने व त्यांचे कर्मचारी तयार असतील तर त्यांना एका दिवसांत १२ तासांची शिफ्ट करावी लागेल. ४ दिवस १२ तास काम केल्यावर ४८ तास कामाची मर्यादा पूर्ण होणार आहे. राहिलेले तीन दिवस कर्मचारी साप्ताहिक सुट्टी घेऊ शकतील. आस्थापने व कर्मचारी यांची परस्पर संमती असल्यास हा बदल लागू करण्यास कुठलीच कायदेशीर अडचण येणार नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
ओव्हरटाईमचे नियम व ब्रेक
१२ तासांच्या दैनंदिन कामाच्या वेळेत कर्मचाऱ्यांना ‘मध्यंतर’ (ब्रेक) देणे गरजेचे असल्याचे कामगार व रोजगार मंत्रालयाच्या माहितीत समाविष्ट करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी ४८ तासांपेक्षा जास्त काम केल्यास; त्यांना नव्या नियमानुसार ‘ओव्हरटाईम’चे दुप्पट पैसे द्यावे लागणार आहेत. खाजगी कंपन्यांतही हे नवे बदल लागू करावे, अशी मागणी आहे.