दिल्ली-आग्रा एक्सप्रेसवेवर धुक्यामुळे १० वाहनांचा भीषण अपघात : ४ जण ठार; २५ जण जखमी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
दिल्ली-आग्रा एक्सप्रेसवेवर धुक्यामुळे १० वाहनांचा भीषण अपघात : ४ जण ठार; २५ जण जखमी

नवी दिल्ली : मथुरा येथे मंगळवारी सकाळी दिल्ली-आग्रा एक्सप्रेसवेवर (Delhi-Agra Expressway in Mathura) दाट धुक्यामुळे सात बसेस व तीन कारची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. त्यात चार जण ठार झाले तर २५ जण जखमी झाले. अपघातानंतर अनेक वाहनांना आग लागून पेट घेतला. 

धुक्यामुळे कमी दृश्यमानतेमुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळली व टक्कर झाल्यानंतर अनेक वाहनांना आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्लोक कुमार (Senior Superintendent of Police (SSP) Shlok Kumar ) यांनी अपघाताच्या माहितीला दुजोरा देत सांगितले की, बचाव कार्य पूर्ण होत आले आहे व ब्लॉक केलेला महामार्ग मोकळा करण्यासाठी व अडकलेल्या प्रवाशांना नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

मंगळवारी सकाळी मथुरा येथील यमुना एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात किमान चार जणांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, शोध आणि बचाव कार्य आता जवळजवळ पूर्ण होत आले आहे. आतापर्यंत आम्ही चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करू शकतो. २५ जण गंभीर जखमी झाले असून, हॉस्पिटलात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यात कुणी गंभीर जखमी नाही. अपघाताठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांना सरकारी वाहनांद्वारे त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करत आहोत. 

मथुराचे जिल्हाधिकारी (डीएम) चंद्र प्रकाश सिंह यांनी घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. दाट धुक्यामुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळली. सध्या प्राधान्याने मदत कार्यावर भर देण्यात येत आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. १२ हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या व १४ हून अधिक रुग्णवाहिका तत्काळ तैनात करण्यात आल्या आहेत. जखमींना सी.एच.सी. बलदेव ‌आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले. 


हेही वाचा