
बाराबंकी : बोगस डॉक्टरने (Bogus Doctor) नशेत यूट्यूब (Youtube) पाहून शस्त्रक्रिया (Operation) करून २५ वर्षीय महिलेची आतडी, नसा व अन्ननलिका कापली. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन महिला मृत्यू पावली. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी जिल्ह्यातील दफरापूर येथील घटनेने एकच खळबळ माजली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, दफरापूर माजरा सैदानपूर गावातील तेज बहादूर रावत यांची पत्नी आजारी होती व तिला पोटात प्रचंड वेदना होत होत्या. त्यानंतर पत्नीला घेऊन येथील श्री दामोदर औषधालयात उपचारासाठी गेले. क्लिनिक मध्ये असलेल्या ग्यान प्रकाश मिश्राने तिला किडनी स्टोन असल्याचे सांगितले. त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी २५ हजार रुपये एवढे शुल्क सांगितले. पतीने २० हजार रुपये शुल्क भरल्यानंतर डॉक्टरने ऑपरेशन सुरू केले. पती तेज बहादूर रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर नशेत होता. बोगस डॉक्टर असल्याने काहीच माहिती नसताना यूट्यूब पाहून किडनी स्टोनचे ऑपरेशन सुरू केले. नशेत असलेल्या डॉक्टरने महिलेचे लहान आतडे व नसा कापल्या. त्यामुळे महिला रक्तस्त्राव होऊन मृत्यू पावली. या दुर्दैवी घटनेनंतर डॉक्टर दवाखाना बंद करून आपल्या कुटुंबासहीत पळून गेला.
यासंदर्भात माहिती देताना बाराबंकी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (Superintendent of Police, Barabanki) अर्पीत विजयवर्गीया यांनी सांगितले की, महिलेवर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने तिचा मृत्यू झाला. डॉक्टर चालवत असलेल्या दवाखान्याचे आरोग्य खात्याकडे नोंदणी नव्हती. सामाजिक माध्यमावर पाहून डॉक्टरने शस्त्रक्रिया केल्याचे कुटुंबीय सांगत आहेत, त्याची पडताळणी केली जात असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. पोलिसांनी डॉ. ग्यान प्रकाश मिश्राविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दवाखावाना सील केला आहे व पुढील तपास करीत आहेत.