एका टिकीटासाठी चाहत्यांनी मोजले १२,००० रुपये; १० मिनिटेही दिसला नाही म्हणत केला राडा!

कोलकाता: अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेसी १४ वर्षांनंतर भारतात आला. त्याच्यासोबत उरुग्वेचे लुईस सुआरेझ आणि अर्जेंटिनाचा मिडफिल्डर रोड्रिगो डी पॉल हे देखील उपस्थित होते. मात्र, कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात केवळ २२ मिनिटांच्या उपस्थितीनंतर मेसी बाहेर पडल्याने संतप्त चाहत्यांनी स्टेडियममध्ये तोडफोड केली आणि स्टँडवरून पाण्याच्या बाटल्या व खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली.

मेस्सी, सुआरेझ आणि डी पॉल हे तिन्ही फुटबॉलपटू रात्री २.३० वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचले. त्यांनी सकाळी ११ वाजता मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. यावेळी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान देखील उपस्थित होता. यानंतर हे सर्व सॉल्ट लेक स्टेडियममध्ये चाहत्यांना भेटण्यासाठी आले. मात्र, ते केवळ २२ मिनिटांत कार्यक्रमस्थळाहून निघून गेले. यामुळे उपस्थित चाहते प्रचंड संतापले.

१२ हजार रुपयांचे तिकीट
मेस्सीच्या एका चाहत्याने आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले की, मेस्सीच्या आजूबाजूला फक्त नेते आणि अभिनेते होते. मग आम्हाला कशासाठी बोलावले? आम्ही १२ हजार रुपयांचे तिकीट घेतले होते, पण आम्हाला त्यांचे तोंडही पाहता आले नाही. या घटनेमुळे चाहत्यांच्या भावना आणि पैसा दोन्ही वाया गेले.
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनावरून पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. तिकीट दरांबाबत आलेल्या अनेक तक्रारींनंतर त्यांनी हे पाऊल उचलले. अनेक चाहत्यांनी तिकीट दर आवाक्याबाहेर असल्याने आपल्या आवडत्या खेळाडूला पाहता येणार नाही, अशी तक्रार लोक भवनमध्ये केली होती.
या घटनेबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून लिओनल मेस्सी आणि सर्व क्रीडाप्रेमींची माफी मागितली आहे. कोलकाता येथील मेस्सीच्या कार्यक्रमात झालेल्या गैरव्यवस्थेमुळे धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले आणि घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याचे जाहीर केले.
मेस्सीचा चार शहरांचा दौरा
युनायटेड नेशन्सच्या युनिसेफ (UNICEF) या बाल संघटनेचे सदिच्छा दूत (ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून मेसी भारतात 'GOAT इंडिया' दौरा करत आहेत. मेसी १५ डिसेंबरपर्यंत ३ दिवसांत ४ शहरांचा दौरा करतील. यात हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्लीचा समावेश आहे. मुंबईत त्यांची सचिन तेंडुलकरशी भेट होणार आहे. १५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने त्यांच्या दौऱ्याची सांगता होईल.