कथन केला धक्कादायक प्रसंग. आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरालगतच्या प्रसिद्ध बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आतापर्यंत १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ४२ जण जखमी झाले आहेत. ज्यू नागरिक येथे त्यांचा सण साजरा करत असताना दोन हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरू केला. यात संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर मृतदेहांचा खच पडला आणि मोठी पळापळ सुरू झाली.

मायकल वॉन यांचा थरारक अनुभव
या अंदाधुंद गोळीबारात इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मायकल वॉन थोडक्यात बचावले. हल्ल्याच्या वेळी वॉन बॉन्डी बीच परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होते. गोळीबाराचे आवाज ऐकून संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला आणि रेस्टॉरंट तत्काळ बंद करण्यात आले.

वॉन यांनी सोशल मीडियावर आपला अनुभव कथन करताना लिहिले, या धक्कादायक घटनेवेळी एका रेस्टॉरंटमध्ये 'लॉक' असणे अत्यंत भीतीदायक होते. सुदैवाने मी आता सुरक्षित घरी पोहोचलो आहे. त्यांनी आपत्कालीन सेवांचे तसेच 'त्या धाडसी व्यक्तीचे' आभार मानले, ज्याने दहशतवाद्याचा सामना केला आणि अनेक नागरिकांचे प्राण वाचवले. या धाडसी व्यक्तीचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात तो निःशस्त्र व्यक्ती शूटरला मागून पकडून, त्याच्या हातातून बंदूक हिसकावून घेताना स्पष्ट दिसतो.

दहशतवादी हल्ला आणि तपासाची व्याप्ती
ऑस्ट्रेलियन पोलिसांनी ही घटना दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर क्रिस मिन्स यांनी सांगितले की, हा हल्ला थेट सिडनीतील यहूदी समुदायाला लक्ष्य करून करण्यात आला आहे.

पोलिसांनी एका हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले, तर दुसऱ्या हल्लेखोराला जखमी अवस्थेत ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या एका वाहनात इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस (IED) असण्याची शक्यता असल्याने, बॉम्बशोधक पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोन हल्लेखोरांची ओळख पटवली असून, तिसऱ्या संशयिताच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान अँथनी अल्बनीझ यांनी या घटनेला धक्कादायक आणि अत्यंत वेदनादायक असे संबोधून, लोकांचे प्राण वाचवणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हीच सध्या सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले.