बाद चलनी नोटा विनिमय रॅकेटचा पर्दाफाश : दिल्ली पोलिसांनी ३.५ कोटींच्या नोटा केल्या जप्त

चार जणांना अटक; पाचशे, हजारांच्या नोटांचा समावेश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
11th December, 12:58 pm
बाद चलनी नोटा विनिमय रॅकेटचा पर्दाफाश : दिल्ली पोलिसांनी ३.५ कोटींच्या नोटा केल्या जप्त

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर चलन विनिमय रॅकेटचा (Delhi police busts illegal exchange racket)  पर्दाफाश केला आहे. ३.५ कोटी रुपयांच्या रद्द (Demonetised) केलेल्या नोटांसहीत चौघांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या नोटांत प्रामुख्याने पाचशे व हजाराच्या नोटांचा समावेश आहे. 

दिल्ली पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा बदलून देणारे रॅकेट असल्याचे पुढे आले आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींनी जुन्या चलनी नोटा गोळा करून त्या मूळ किंमतीपेक्षा थोडी कमी रक्कम देऊन बदलून दिल्याची कबुली दिल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे व ३.५ कोटी रुपयांच्या पाचशे व हजाराच्या नोटा जप्त केल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापासत्र सुरू केले. त्यानंतर शालीमार बाग मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक जवळ ४ जणांना अटक करण्यात आली.  त्याचबरोबर वापरण्यात आलेली दोन वाहनेही जप्त करण्यात आली. 

अटक करण्यात आलेल्यांचा दावा आहे की, ते ’आरबीआय’मध्ये नोटा बदलून देऊ शकतात. रद्द करण्यात आलेल्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बदलून देऊ शकतो, असा बनाव करून ते जुन्या चलनी नोटा गोळा करीत होते. बॅंक चलनी नोटांच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून रॅकेट सुरू होते.

चलनात नसलेल्या बेकायदेशीर नोटा जवळ बाळगणे गुन्हा आहे, याची माहिती असूनही रॅकेट चालवले जात होते. नोटा जवळ बाळगण्यासंदर्भात कागदपत्रे किंवा स्पष्टीकरण त्यांच्याकडे नव्हते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. नोटांचा स्त्रोत, संभाव्य खरेदीदार व यामध्ये सामील असलेल्यांचा सखोल तपास दिल्ली पोलीस करीत आहेत. 


हेही वाचा