
जेरुसलेम : इस्रायली लष्कराला (IDF) एक मोठे यश मिळाले आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या भीषण हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि हमासच्या शस्त्र उत्पादन विभागाचा प्रमुख कमांडर राद साद याला इस्रायली सुरक्षा दलांनी (IDF) हवाई हल्ल्यात कंठस्नान घातले आहे.

राद साद हा हमासच्या सैन्य युनिटच्या शस्त्र उत्पादन मुख्यालयाचा प्रमुख होता. तो ७ ऑक्टोबरच्या नरसंहारातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक होता. IDF ने 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सादला लक्ष्य करणाऱ्या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. IDF नुसार, राद साद हा गाझा पट्टीमध्ये शिल्लक राहिलेल्या हमासच्या शेवटच्या अनुभवी वरिष्ठ दहशतवाद्यांपैकी एक होता. तो हमासच्या सैन्य युनिटचा उपप्रमुख मारवान ईसा याचा जवळचा सहकारी होता. त्याने संघटनेत अनेक वरिष्ठ पदे भूषवली होती आणि हमासच्या लष्करी नेतृत्वातील तो एक महत्त्वाचा दुवा होता.

अनेक इस्रायली सैनिकांच्या हत्येसाठी जबाबदार
युद्धकाळात हमासच्या शस्त्र उत्पादन युनिट्सने तयार केलेल्या स्फोटक उपकरणांमुळे अनेक इस्रायली सैनिकांची हत्या झाली होती, यासाठी साद मुख्यत्वे जबाबदार होता. इतकेच नाही, तर अलीकडच्या काही महिन्यांमध्ये युद्धविराम कराराचे उल्लंघन करण्यामध्ये त्याचा थेट सहभाग होता. युद्धविरामाच्या काळातही गाझा पट्टीमध्ये शस्त्रास्त्रांचे उत्पादन सुरू ठेवण्यावर त्याचे लक्ष होते. राद सादच्या खात्मामुळे हमासची स्वतःची क्षमता पुन्हा स्थापित करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या कमी होईल, असे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले आहे.
