असिस्टेंट लोको पायलट , टेक्नीशियन, नॉन-टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी आणि ग्रुप डीसह विविध पदांसाठी नोटिफिकेशनच्या संभाव्य तारखा आल्या समोर

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) सन २०२६ मध्ये होणाऱ्या विविध भर्ती परीक्षांचे संभाव्य कॅलेंडर (Calendar) नुकतेच जाहीर केले आहे. रेल्वेने भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने उचललेले हे पाऊल असून, यामुळे सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना आतापासूनच परीक्षेच्या तयारीला सुरुवात करणे शक्य होणार आहे.

आरआरबीच्या या तात्पुरत्या वेळापत्रकात असिस्टेंट लोको पायलट (ALP), टेक्नीशियन, ज्युनियर इंजिनियर (JE), नॉन-टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी (NTPC) आणि ग्रुप डी (लेव्हल-१) अशा प्रमुख आणि मोठ्या भरतींच्या नोटिफिकेशनच्या संभाव्य तारखांचा समावेश आहे.

आरआरबी परीक्षा कॅलेंडर २०२६
रेल्वे भर्ती बोर्डाने २०२६ वर्षासाठी विविध श्रेणींच्या भरती नोटिफिकेशनचा जो तात्पुरता आराखडा दिला आहे, तो इच्छूक उमेदवारांसाठी स्पष्ट मार्गदर्शक ठरणार आहे:
पहा भरती प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक

२०२६ ची सुरुवात: लोको पायलट आणि टेक्नीशियन (जानेवारी ते मार्च)
नवीन वर्षाची सुरुवात असिस्टेंट लोको पायलट (ALP) च्या भरती प्रक्रियेने होणार आहे. याचे नोटिफिकेशन फेब्रुवारी २०२६ मध्ये जारी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच टेक्नीशियन पदांसाठीची अधिसूचना मार्च २०२६ मध्ये जारी होऊ शकते. यासोबतच सेक्शन कंट्रोलरसाठी नोटिफिकेशन एप्रिल २०२६ मध्ये येण्याची शक्यता आहे.

वर्षांच्या मध्यात प्रमुख भरती (एप्रिल-जून आणि जुलै-सप्टेंबर)
वर्षाच्या मध्यामध्ये दोन महत्त्वाच्या भरती आहेत. जुलै २०२६ मध्ये ज्युनियर इंजिनियर (JE), डेपो मटेरियल सुपरिंटेंडेंट (DMS), केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट (CMA) आणि पॅरामेडिकल श्रेणींसाठी नोटिफिकेशन जारी होण्याची अपेक्षा आहे. यापाठोपाठ, ऑगस्ट २०२६ मध्ये सर्वात मोठ्या भरतीपैकी एक असलेल्या नॉन-टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी (NTPC) (पदवीधर आणि अंडरग्रेजुएट दोन्ही स्तरांसाठी) साठीची अधिसूचना जारी होऊ शकते.

वर्षाचा अंतिम टप्पा: मिनिस्टीरियल आणि ग्रुप डी (ऑक्टोबर ते डिसेंबर)
वर्षाच्या अंतिम टप्प्यात, सप्टेंबर २०२६ मध्ये मिनिस्टीरियल आणि आयसोलेटेड कॅटेगरीजसाठी नोटिफिकेशन जारी होण्याची शक्यता आहे. यानंतर, सर्वाधिक उमेदवारांची प्रतीक्षा असलेली ग्रुप डी (लेव्हल-१) या पदांसाठीची अधिसूचना ऑक्टोबर २०२६ मध्ये जारी होऊ शकते.

आरआरबीच्या या निर्णयामुळे भरती प्रक्रिया एका निश्चित चक्रात सुरू राहील आणि उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. तथापि, सर्व उमेदवारांनी हे वेळापत्रक तात्पुरते (Provisional) असल्याचे लक्षात घ्यावे आणि अधिकृत नोटिफिकेशनसाठी संबंधित आरआरबीच्या प्रादेशिक वेबसाइट्स नियमितपणे तपासाव्यात.