हणजूण पोलीस स्थानकात कडक बंदोबस्त

पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबला लागलेल्या भीषण आग प्रकरणातील मुख्य संशयित गौरव आणि सौरभ लुथरा या दोघांना घेऊन गोवा पोलिसांचे पथक दिल्लीहून विमानाने बुधवारी सकाळी ११ वाजता गोव्याच्या मोपा विमानतळावर दाखल झाले. यावेळी विमानतळावर मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. त्यांना आता हणजूण पोलीस स्थानकात हजर केले जाईल. चौकशीनंतर म्हापसा न्यायालयात सादर केले जाईल. हणजूण पोलीस स्थानकाबाहेर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने मंगळवारी संध्याकाळी लुथरा बंधूंना दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना गोव्यात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गोव्यात पोहोचल्यानंतर त्यांना म्हापसा येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. गोवा पोलिसांनी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून, यापूर्वी त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते.
या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी अजय गुप्ता, राजीव मोडक, प्रियांशू ठाकूर, राजवीर सिंघानिया, विवेक सिंग आणि भारत कोहली या इतर सहकाऱ्यांना अटक केली आहे. आग लागली तेव्हा क्लबमध्ये १५० हून अधिक पर्यटक उपस्थित होते. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लुथरा बंधूंच्या अटकेमुळे आता अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
REFRESH THE PAGE AFTER REGULAR INTERVALS
LIVE :
11 : 30 AM : लुथरा बंधू मोपा विमानतळावरून रवाना; हणजूण पोलीस स्थानकात कडक बंदोबस्त
मोपा विमानतळाबाहेर पडताच गौरव आणि सौरभ लुथरा यांना घेऊन पोलीस हणजूण पोलीस स्थानकाकडे रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठाण्याच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
11 : 45 AM : वैद्यकीय तपासणी सुरू
लुथरा बंधूंना वैद्यकीय तपासणीसाठी शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रक्रिया सुरू.