भीषण आग नियंत्रणासाठी ६० कर्मचाऱ्यांचा सहभाग : वानांनी अनुभवला मन हेलावणारा प्रसंग

म्हापसा : साकवाडी, हडफडे (Sakwadi, Hadfade) येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबमध्ये (Birch by Romeo Lane Club) घडलेली भयावह अग्नितांडव घटना ही आजही अग्निशमन दलाच्या जवानांच्या अंगावर काटा आणत आहे. प्रथमच अशा घटनेला हे कर्मचारी सामोरे गेले होते. ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी दलाच्या सुमारे ६० जवानांनी अथक प्रयत्न केले. क्लबच्या तळमजल्यावर मृतावस्थेत पडलेले दोन डझन मृतदेह पाहण्याचा मन हेलावणारा प्रसंग त्या रात्री दलाच्या जवानांनी अनुभवला.
शनिवार दि. ६ डिसेंबर रोजी रात्री घडलेली ही आग विझवण्याच्या कार्यात म्हापसा, पिळर्ण, पर्वरी व पणजी या चार अग्निशमन दलाच्या स्टेशनच्या जवानांचा समावेश आहे. अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर, विभागीय अधिकारी बॉस्को फेर्राव व चारही स्टेशनच्या स्टेशन अधिकाऱ्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली.
आग नियंत्रणात येताच दलाचे जवान विष्णू गावस व स्वप्नेश कळंगुटकर हे दोघे आत गेले. तिथे क्लबमधून तळमजल्यावर जाणाऱ्या स्टेअरकेसवर (जिना) जळालेले दोन महिलांचे मृतदेह दिसले. या मृतदेहांवर जळालेली लाकडे कोसळली होती. तळ व पहिल्या मजल्याच्या दरम्यान जिन्यावर मध्यभागी हे मृतदेह होते. तळमजल्यावर माणसे अडकली असावीत, असा संशय व्यक्त करून दोन्ही जवान खाली जाताच तिथे एकमेकांवर पडलेली अनेक माणसे दिसली. हे लोक जिवंत असावेत म्हणून या सर्वांची पल्स दोन्ही जवानांनी तपासली. पण त्यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांनीच मृतदेह बाहेर काढले. मात्र, मृतदेह जास्त असल्याने नंतर रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली.
दुर्घटनेवेळी दलाच्या जवानांना आग तसेच आतमध्ये कोणी अडकले आहेत का, याबाबतची कोणीही काहीच माहिती किंवा कल्पना देत नव्हते. अशा स्थितीत तास-दीड तासानंतर संपूर्ण आग नियंत्रणात आणण्याचे कौतुकास्पद काम या जवानांनी केले. परंतु, या दुर्घटनेतील मृतांपैकी एकाही व्यक्तीला वाचवता न आल्याची खंत बचाव कार्यातील दलाच्या जवानांना वाटत आहे.
कुलूपबंद दरवाजा ठरला मृत्यूचे कारण
बर्च क्लबला आग लागताच आत असलेले शंभर-दीडशे लोक वाट मिळेल तिथे स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धावले. यातील कर्मचारी आणि पर्यटक हे तळमजल्यावर पळाले. तिथे स्वयंपाक खोली, बार काऊंटर होता. या मजल्यावर हवा ये-जा करण्यासाठी कोणतीही व्हेंटिलेशनची व्यवस्था नव्हती. एक मागचा दरवाजा होता. मात्र त्याला बाहेरून कुलूप लावले होते. त्यामुळे तो दरवाजा या लोकांना उघडणे शक्य झाले नाही. तर समोरच्या दरवाजावर आगीच्या ज्वाळा होत्या. यामुळे हे २३ लोक तळमजल्यावर अडकले आणि आगीच्या धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.
आग नियंत्रणाचे आव्हान
अग्निशमन दलाला या दुर्घटनेची माहिती त्या दिवशी रात्री ११.४५ च्या सुमारास मिळाली. रात्री ११.५५ च्या सुमारास पथक घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा संपूर्ण क्लबला आगीने वेढले होते. घटनास्थळी बंब पोहोचणे शक्य नसल्याने, क्लबपासून ८० मीटर अंतरावर बंब ठेवून पाईप्सच्या साहाय्याने पाण्याचा फवारा मारून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू झाले. अवघ्या १०-१५ मिनिटांत क्लबच्या आवारातील मिठागरातील पाण्याचा वापर करून आग नियंत्रणात आणण्यात यश आले.