ॲड. रोहीत ब्राझ डिसा यांची ॲमिकस क्युरी म्हणून नेमणूक

पणजी : बर्च बाय रोमिओ लेन क्लबला (Birch by Romeo Lane Club, Goa) लागलेल्या आग प्रकरणाची गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) स्वेच्छा याचिका दाखल करून घेत दखल घेतली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाला आवश्यक माहिती देण्यासाठी ॲड. रोहित ब्राझ डिसा यांची ॲमिकस क्युरी म्हणून नेमणूक केली आहे. या याचिकेवर (Petition) ८ जानेवारी, २०२६ रोजी सुनावणी होणार आहे.
व्यावसायिक बांधकामे व ती पाडण्यासाठी दिलेल्या स्थगितीचा विषय आता उच्च न्यायालयात पोचला आहे. बर्च बाय रोमिओ लेन क्लबच्या जमिनीसंबंधी प्रदीप घाडी आमोणकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी व्यावसायिक बांधकामांना दिलेल्या स्थगितीवर सुद्धा चर्चा झाली. बेकायदा बांधकामे व त्यांच्या परिणामांविषयी उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. त्यासाठी न्यायालयाने स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली आहे.
बर्च बाय रोमिओ लेन क्लबला शनिवारी ६ डिसेंबरला आग लागून २५ जण मृत्यू पावले होते. या दुर्घटनेची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे. दंडाधिकाऱ्यांनी जमिनीच्या कागदपत्रांसंबंधी प्रदीप घाडी आमोणकर, सुनिल दिवकर या दोघांची चौकशी केली आहे. चौकशी सुरू असताना प्रदीप घाडी आमोणकर यांनी गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयात चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली.
या याचिकेवर आज न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. राज्यात व्यावसायिक बांधकामांचे प्रमाण वाढत आहे.बर्च बाय रोमिओ लेन दुर्घटनेनंतर सरकारने समिती स्थापन करून क्लब, रेस्टॉरंट, हॉटेल्स यांच्या परवान्यांची तपासणी सुरू केली. परवाने नसलेल्या दियाज (हणजूण), सीओ २ (वागातोर) य क्लबना सील ठोकण्यात आले. पंचायतीने पाडण्याचे आदेश देऊनही पंचायत संचालनालयाने आदेशाला स्थगिती दिल्याने कारवाई होऊ शकली नाही. सुनावणीच्या वेळी हा विषय चर्चेला आला आणि उच्च न्यायालयाने स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली.