
पणजी : विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन खात्यातर्फे सातवा मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव १८ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाची मुख्य कार्यशाळा दोनापावला येथील एनआयओ (NIO) येथे होणार आहे, तर राज्यातील इतर नऊ ठिकाणी तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
यावेळी आयआयएसी (IISC) बंगळूरचे डॉ. साई गौतम गोपाळकृष्णन यांना 'मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्काराने' सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष जुझे नोरोन्हा यांनी दिली.
पर्वरी सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत जुझे नोरोन्हा आणि विज्ञान, तंत्रज्ञान व कचरा व्यवस्थापन खात्याचे संचालक हरीश अडकोणकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड आणि वैज्ञानिक प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी या महोत्सवाची रचना करण्यात आली आहे, असे अडकोणकर यांनी यावेळी सांगितले.
या महोत्सवात देशभरातील नामवंत वैज्ञानिक, संशोधक एकत्र येणार आहेत. ते संवादपूर्ण व्याख्याने आणि आकर्षक वैज्ञानिक प्रवचनांद्वारे भावी पिढीला प्रोत्साहन देतील. गोव्याचे माजी मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री आणि आयआयटी मुंबईचे पदवीधर असलेल्या मनोहर पर्रीकर यांच्या वारशाचा सन्मान या महोत्सवात केला जातो, असेही अडकोणकर यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते एनआयओ, दोनापावला येथे होईल. या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) राज्यातील इतर नऊ ठिकाणी केले जाणार आहे. या नऊ ठिकाणी सुमारे ४,३०० विद्यार्थ्यांची आसन क्षमता आहे. हे सर्व कार्यक्रम सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान होतील. सकाळी ९.३० ते ११.०० वाजेपर्यंत बीजभाषणाचे थेट प्रक्षेपण झाल्यानंतर सर्व ठिकाणी वेगवेगळ्या व्याख्यानांना सुरुवात होईल, अशी माहिती नोरोन्हा यांनी दिली.